हॅलो कृषी ऑनलाईन : बदलते हवामान , सततची नापिकी आणि बाजारातील घसरते दर या सर्व अडचणींमुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अशातच वाढत्या महागाईमुळे रोजचा खर्च, मुलांचं शिक्षण भागवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र वाशिमच्या एका शेतकऱ्याने आपल्या या परिस्थितीला हतबल न होता एक वेगळाच मार्ग शोधत स्वतः आणि इतरांना देखील सकारात्मकतेचा मार्ग दाखवला आहे. हा शेतकरी औरंगाबाद जिल्ह्यात घरोघरी जाऊन ताजी, तुमच्या डोळ्यादेखत हळद दळून देतो आणि त्याची विक्री करतोय. आपलया दुचाकी वाहनाला त्याने हळद दळायचे मशीन जोडले असून हळद विक्रीचा हा त्यांचा देशी जुगाड चांगलाच काम करू लागलाय आणि हा चालत फिरता प्रक्रिया उद्योग या शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देत आहे.
चालता फिरता हळद प्रक्रिया उद्योग
“आमच्याकडे शुद्ध गावरान हळद दळून मिळेल …” ! असा भोंगा औरंगाबाद शहरात ऐकायला मिळतो आहे. शिवाजी कुरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते वाशीम येथील शेतकरी आहेत. आपल्या दुचाकीला त्यांनी हळद दळण्याची छोटी गिरण जोडली आहे. या गिरणीमधून आपल्याच शेतातली हळद केवळ १६० रुपये किलो प्रमाणे ते दळून देतात. दर दिवशी साधारण ५०-६० गिर्हाईक करीत त्यांना दिवसाला १०००-२००० रुपये मिळतात. आणि महिन्याच्या हिशेब काढला तर जवळपास त्यांना लाख रुपये महिन्याकाठी मिळतात असे त्यांनी सांगितले.
गावरान शुद्ध हळदीला ग्राहकांची पसंती
सध्या बाजारातील पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशात हळदीचा विचार केला तर बऱ्याचदा हळदीमध्ये पिवाल्या रंगाची भेसळ केलेली पाहायला मिळते. मात्र आपल्या नजरेदेखतच शुद्ध गावरान हळद ग्राहकांना कमी किमतीमध्ये मिळत असल्यामुळे ग्राहक देखील खरेदी करतात. बाजारात मिळणाऱ्या हळदीची किंमत ही २५०-३०० रुपये किलो आहे. त्यातुलनेत कुरे यांच्याकडे मिळणारी हळद स्वस्त आणि मस्त असल्यामुळे ग्राहक ही हळद हमखास विकत घेताना दिसतात.
काठीन प्रसंगामध्ये रडत बसण्यापेक्षा काहीतरी वेगळा मार्ग काढून कशी प्रगती साधता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे करे हे शेतकरी … आपल्या दोन एकर शेतात हळदीचे पीक घेऊन स्वतः चालता फिरता प्रक्रिया उद्योग सुरु करून त्यांनी इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी मार्ग दाखवला आहे.