हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून कोरोनाची परिस्थिती ,लहरी हवामान आणि मालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना गुलाबाच्या शेतीतून मावळच्या शेतकऱ्यांनी संधीचे सोने करीत तब्बल ४० ते ४५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. निमित्त होतं ‘व्हॅलेंटाईन डे’ चं … जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाला या काळात मोठी मागणी असते. याच संधीचे सोने करीत मावळातल्या शेतकऱ्यांनी गुलाबाची देशात आणि प्रदेशात विक्री करून मोठा आर्थिक नफा मिळवला आहे.
कोरोनामुळे दोन वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते मात्र हे नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने गुलाबाची लागवड करून जिद्दीने जोपासना करून व्हॅलेंटाईन डे साठी मावळ येथून सुमारे एक कोटी प्रदेशात तर देशांतर्गत बाजारपेठेत दिड कोटी गुलाबांची फुले विक्रीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यातून तब्बल ४० ते ४५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. व्हॅलेंटाईन डे मुळे देश आणि परदेशातून गुलाबाला मोठी मागणी असते. यंदा मावळ मधून १ कोटी फुलांची विक्री करण्यात आली मात्र त्या फुलांसाठी एका नागामागे १३ ते १४ रुपये मिळाले. मात्र देशात एका नगासाठी १५ ते १६ रुपये मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.