Farmers Success Story: काका पुतण्याने रेशीम शेतीतून मिळवले आर्थिक स्थैर्य! जाणून घ्या त्यांच्याकडून रेशीम शेतीपासून मिळणारे इतर फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील (Farmers Success Story)  सदाशिव कांबळे आणि विजय कांबळे या काका-पुतण्यांनी रेशीम शेतीमध्ये (Silk Farming) मारलेली मजल कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे (Farmers Success Story) .

ज्वारीचे आगार समजल्या जाणारा सोलापूर जिल्हा (Solapur District) आता फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात आता रेशीम शेती (Sericulture) सुद्धा नावारूपाला आलेली आहे.  

सदाशिव आणि विजय कांबळे यांचा परंपरागत शेती व्यवसाय आहे. पाच एकर शेतात विहीर आणि विंधन विहिरीच्या माध्यमातून उपलब्ध मुबलक पाण्यावर पूर्वी उसाची शेती करायचे. परंतु ऊस देखील आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे पाच वर्षांपूर्वी कांबळे कुटुंबियांनी शेतीपूरक रेशीम उत्पादन (Farmers Success Story) करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला.

मोहोळ व आसपासच्या तालुक्यांमध्ये काही शेतकरी तुतीची लागवड (Mulberry Plant) करून यशस्वीपणे रेशीम उत्पादन घेत असल्याचे पाहायला मिळाले (Farmers Success Story). रेशीम उत्पादनाचा चांगला अनुभव असल्याचे कांबळे यांच्या जवळच्या नातेवाईकाने सांगीतले.  

या नातेवाईकाने कांबळे यांना व्ही- 1 (V1) जातीची तुती उपलब्ध करून दिली. या जातीच्या तुतीचा पाला सहसा सुकत नाही आणि तो आकाराने मोठा असतो. रेशीम उद्योगाचा चांगला अनुभव असलेले सौदागर पांडव (पीर टाकळी, ता. मोहोळ) यांनीही कांबळे यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यातच भर म्हणून कुटुंबातील विजय कांबळे याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जाऊन बीएससी (शेती) पदवी शिक्षण (B.Sc. Agriculture) घेतले आणि काही पिकांच्या प्रकल्पासाठी पूरक प्रशिक्षणही घेतले (Farmers Success Story).

कुरूलमध्ये परतल्यानंतर त्याने बौद्धिक कौशल्य आणि सकारात्मक इच्छाशक्तीच्या आधारे दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसायाच्या धर्तीवर शेतीपूरक रेशीम उद्योगाचा बारकाईने अभ्यास केला. तो फलदायी ठरला. देशात सर्वाधिक रेशीम उत्पादन शेजारच्या कर्नाटकात होते. त्यामुळे कर्नाटकात जाऊन त्याने रेशीम शेतीचा व्यापक अभ्यास केला. बाजारपेठांचीही माहिती घेतली. रेशीम उत्पादनाला मिळणारा भाव, शासनाचे पोषक धोरण लाभदायक होते. यात महत्त्वाची बाब म्हणजे रेशीम उद्योगासाठी होणारा उत्पादन खर्च तुलनेने कमीच असतो. मजूरांवर अवलंबून न राहता घरच्या लहानमोठ्या मंडळींनी शेतात राहून थोडी मेहनत घेतली तर रेशीम शेती यशस्वी होते. पर्यायाने दरमहा पुरेसा पगार मिळाल्यागत उत्पन्न हाती येते (Farmers Success Story). 15 वर्षांपर्यंत रेशीम उत्पादनातून आर्थिक विवंचना सतावत नाही.

रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजय कांबळे आणि सदाशिव कांबळे यांनी त्या अनुषंगाने नियोजन हाती घेतले (Farmers Success Story). तीन एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली. घरात पुरेसे आर्थिक भांडवल नव्हते. काही रक्कम उधारीने घेतली तर काही रक्कम बचत गटातून कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध केली. पाच लाख रूपयांच्या भांडवलातून त्याने रेशीम शेतीचा श्रीगणेशा केला. या शेतीसाठी शासनाकडूनही जवळपास साडेतीन ते चार लाख रूपयांपर्यंत अनुदान मिळते.

सदाशिव कांबळे यांनी डोळस दृष्टी ठेवून कर्नाटकातील अथनी येथून रेशीम अळ्यांचे 100 अंडपुंज मागविले. एका अंडपुंजामध्ये 400 ते 500 रेशीम अळ्या असतात. सुमारे चार हजार रुपये किंमतीच्या शंभर अंडपुंजांच्या माध्यमातून 45 ते 50 हजार अळ्या आणल्या. रेशीम अळ्यांचे एकूण आयुष्य 28 दिवसांचे असते. यातील 24 दिवस त्यांना तुतीचा पाला खाद्या म्हणून द्यावा लागतो. अवघ्या 14 दिवसांनी रेशीम कोश तयार होतो. रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड पट्टा पद्धतीने अर्थात 6 बाय 2 फूट अंतराने करताना त्यात ऊन, वारा खालपर्यंत जाईल, याची दक्षता कांबळे यांनी घेतली आहे. पट्टा पद्धतीने तुती लागवड करताना दोन तुतींमधील अंतर चांगले असेल तर रेशीम उत्पादनही चांगले होते. अंतर कमी असल्यास वारा, ऊन तुतीच्या खालपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे रेशीम अळी मोठी होताना कोशावर जाताना धागा बाहेर काढण्याची शक्यता कमी असते. त्याची काळजी विजय कांबळे यांनी घेतली आहे. शेतात रेशीम उत्पादनासाठी उभारलेला शेड, त्यातील जाळ्या शास्त्रीय पद्धतीच्या आहेत (Farmers Success Story).

रेशीम शेतीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी लागते. कांबळे यांची जमीन पोषक आहे. पूर्वी ऊस शेती करताना एक एकर क्षेत्रात लागणार्‍या पाण्यावर आता तीन एकर तुतीची शेती जोपासता येते. एकदा लागवड केलेली तुती 15 वर्षांपर्यंत जिवंत राहते. त्यामुळे दरवर्षी पुन:पुन्हा लागवड करावी लागत नाही. इतर पिकांप्रमाणे वारंवार करावा लागणारा लागवडीचा खर्च होत नाही. साधारणपणे उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती सहसा सुकत वा मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. त्यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकर्‍यांना देखील रेशीम व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येते (Farmers Success Story).

कांबळे यांच्या शेतात गेल्या चार वर्षांत दर महिना-सव्वा महिन्यात 300 किलोपर्यंत रेशीम उत्पादन (Silk Production) होते. त्याची विक्री व्यवस्था कांबळे यांना चांगल्या प्रकारे अवगत झाली आहे. 30 ते 40 दिवसांत हे उत्पादित रेशीम कर्नाटकात रामपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जाते. प्रति किलोस 400 ते 450 रुपये भाव पदरात पडतो. कर्नाटकात उत्पादित रेशीम नेण्यासाठी वाहतूक खर्च परवडण्याच्या अनुषंगाने मोहोळ परिसरातील 18 ते 20 रेशीम उत्पादक शेतकरी एकत्रपणे मिळून सुमारे एक टनापेक्षा जास्त रेशीम कर्नाटकात पाठवतात. या माध्यमातून वाहतुकीसह इतर खर्च वजा करून दरमहा एक लाखापर्यंत उत्पन्न मिळते. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कांबळे यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्या रेशीम उद्योगाची पाहणी केली आहे. एकूणच, जीवनात आर्थिक ऊर्जितावस्था मिळत असल्याचे कांबळे कुटुंबियांना समाधान वाटते (Farmers Success Story).

रेशीम शेतीचे अन्य फायदे (Benefits Of Silk Farming)

  • रेशीम अळ्यांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रासप्रमाणे खाद्या म्हणून वापरता येते. त्यामुळे दूध उत्पादन वाढू शकते.
  • तुतीचा वाळलेला पाला आणि रेशीम अळ्यांची विष्ठेचा गोबर गॅससाठी उपयोग करून इंधन म्हणून वापर होऊ शकतो.
  • तुती पाल्यामध्ये ‘अ’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे तुतीचा पाला आणि रेशीम कोश आयुर्वेद औषधासाठी वापरता येतो.
  • विदेशात तुतीच्या पाल्याचा उपयोग चहा (मलबेरी टी) बनविण्यासाठी केला जातो.
  • तुती लागवड आणि रेशीम उत्पादनाला शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन मिळते.