हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे
राज्यात बिल भरले नसल्याच्या कारणावरून अनेक भागात कृषी पंपाची वीज महावितरण कडून तोडण्यात आली होती. त्यानंतर अनेक भागात या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले होते. मात्र आता महावितरणने कृषी वीजबिलांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. थकीत कृषी पंपाच्या वीज बिल मधून थकबाकी मुक्तता मिळावी यासाठी मूळ थकबाकी असलेल्या रकमेची तब्बल 66 टक्के सूट देण्यात येत आहे. यामध्ये येत्या मार्च महिन्यापर्यंत सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा जर केला तर उर्वरित संपूर्ण रक्कम माफ केली जाणार आहे अशी माहिती महावितरचे पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.
याबाबत माहिती देताना पवार म्हणाले की , राज्य शासनाच्या या धोरणामुळे शेतकरी बांधवांना कृषी वीज बिल यांमधून थकबाकी मुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वीज बिलांच्या एकूण मूळ बाकी मधील व्याज व दंड तसेच महावितरणकडून निर्लेखन अशी रक्कम वगळून वीजबिलांची सुधारित थकबाकी काढण्यात आली आहे. या थकबाकी मधील पन्नास टक्के रक्कम येत्या मार्च 2022 पर्यंत भरल्यास संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे.पुणे जिल्ह्यातील खोडद ( जुन्नर) येथे कृषी विभाग, महावितरण व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शेतकरी, महसूल व वीज ग्राहक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
महावीतरण कडून राज्यातल्या अनेक भागात कृषी पंपाची वीज कट केल्यामुळे शिवारातली पिके वाळून चालली होती. तसेच काही भागात तर जनावरांना देखील पाणी देणे मुश्किल झाले होते. मात्र आता मूळ थकबाकी असलेल्या रकमेची तब्बल 66 टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित थकबाकी भरून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.