हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी नवे ई-पीक पाहणी अँप सुरु केले आहे. यावर पीक पेरा तसेच इतर बाबींची नोंदणी करावयाची आहे. ही सुविधा अँड्रॉइड मोबाईलवर उपलब्ध करण्यात आली आहे. आता गावागावाच्या पारावर केवळ याचीच चर्चा सुरु आहे. इंटरनेट , सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे अशा अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मालकापुरातल्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे आधी मोबाईल द्या नंतरच ई पीक पाहणी ची अंमलबजावणी करा अशी मागणी केली आहे.
मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथील शेतकरी दीपक पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना अगोदर मोबाईल द्या आणि नंतरच ई पीक पाहणी ची अंमलबजावणी करा, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पिक पेरा’ या मोहिमेतून चालू हंगाम 2021-22 चा पिक पेरा प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः शेतात जाऊन अँड्रॉइड मोबाईल द्वारे “ई पीक पाहणी” एप्लीकेशन डाऊनलोड करून ऑनलाइन नोंदवायचा आहे. परंतु पीक पेरा नोंदविण्यासाठी बहुसंख्य शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ते शेतकरी सदर पीक पेरा नोंदवू शकत नाही.
आधी शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल घेऊन द्या
जर शेतकऱ्यांनीच पिक पेरा स्वतः ऑनलाइन नोंदवावा असे शासनाचे धोरण असेल, तर पिक पेरा नोंदविण्यासाठी ज्या शेतकऱ्यां कडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांना शासनाने आधी अँड्रॉइड मोबाईल खरेदी करून द्यावा ,आणि नंतरच शेतकऱ्यां मार्फत पिक पेरा नोंदवावा, अशी मागणी शेतकरी पाटील यांनी केलीय. तसे निवेदन ही वाकोडी येथील शेतकरी दीपक पाटील यांनी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,आणि कृषिमंत्री यांना पाठविले आहे.
ई पीक पाहणी म्हणजे काय?
–आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद ही तलाठी यांच्यामार्फत केली जात होती.
–प्रत्यक्ष गटात न जाता शेतकरी ज्या पिकाची नावे सांगेल त्याच पिकाचा पेरा झाला असे ग्राह्य धरुण त्याची नोंद होत असत.
–त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना आधिकारी यांना करावा लागत होता.
–अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदी नसतानाही शासकीय मदत लाटली जात होती.
— शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचू्क नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने ‘ई-पीक पाहणी’ अॅप निर्माण करण्यात आले आहे.
–यामाध्यमातून शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पिक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाणही अक्षांश / रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे.