सोलापुरातील किसान रेल्वे बंद ; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 1 कोटींचा फटका

Kisan Rail
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातील शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी किसान रेल्वे खूप महत्वाचे साधन होते. या माध्यमातून देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांचा माल पोहचायचा आणि शेतकऱ्यांना चांगली किंमतही मिळायची. त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांना ही किसान रेल्वे वरदायिनी ठरली होती. पण मागील दोन आठवड्यांपासून ही रेल्वे बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसतो आहे. सांगोला स्टेशन वरून सुटणाऱ्या या शेतीमालवाहू गाडीतून एका फेरीत २५० टन शेतीमाल दिल्ली बाजारपेठेत जात होता. आज ही वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

जवळपास पाचशे टन शेतीमाल रेल्वेने जायचा
जिल्ह्यातून डाळिंब , द्राक्ष , केळी, पेरू, कांदा, लिंबू व भाजीपाला असा जवळपास पाचशे टन शेतीमाल आठवड्यातील दोन फेऱ्यांमधून दिल्लीस जात होता. परंतु मागील आठवड्यापासून अचानक किसान रेल्वेच्या फेऱ्या बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. हा सर्व शेतमाल स्थानिक बाजारपेठेतच विक्री होऊ लागल्याने, येथील बाजारभावही कोसळले आहेत. यामुळे कायमस्वरूपी स्थानिक बाजारपेठेत शेतमाल विक्री करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणपणे एक कोटींचा फटका
पेरू, डाळिंब, द्राक्षाचे भाव सरासरी १५ ते २० रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. एका आठवड्यातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणपणे एक कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. कुर्डुवाडीहून दिल्लीसाठी शेतीमालास सर्वसाधारणपणे अडीच रुपये प्रति किलो भाडे आकारले जाते. तेच भाडे रस्ते वाहतुकीस डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे दहा रुपये प्रति किलोपर्यंत आहे. शिवाय द्राक्षासारख्या नाशवंत मालाचे रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्याच्या मालाला उठाव होण्यासाठी तातडीने किसान रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, रेल्वेने कोळसा वाहतूक सुरू झाली आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या गाड्यांना मार्ग देण्यासाठी किसान रेल्वे तूर्त बंद करण्यात आल्या आहेत, लवकरच किसान रेल्वेची सेवा सुरळीत सुरू होईल. अशी माहिती देण्यात आली.