हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांपुढे उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
मान्सूनपूर्व पावसाने येवला तालुक्यात दमदार हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर आता चांगला पाऊस होईल या भरवशावर शेतकर्यांनी पेरणीकडे कल वाढवला. पण गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू आहे त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर ज्या शेतकर्यांनी पेरणी केली या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
नाशिक येथील येवला तालुक्यात सरासरी 48 मिलिमीटर एवढा पाऊस झाला. जवळपास 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकर्यांनी पेरणी करणं अपेक्षित होतं मात्र मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकर्यांनी या पावसावर वीस हजार हेक्टरवर पेरणी केली. तर वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा परिणाम उत्पादनावर होईल. या भीतीनं दमदार पाऊस पडण्याआधी पेरणी केली. पावसाने दडी मारली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले तर पावसाने दडी मारली नसती तर 73 हजार हेक्टरवर पेरणी होणं अपेक्षित होतं.
पावसाने दडी मारल्यामुळे तसेच कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आता ओढावले आहे त्यामुळे शेतकर्यांची आर्थिक कोंडी देखील होणार असल्याचे चित्र दिसत आहे आता राज्य शासनाने दुबार पेरणीसाठी मोठी आर्थिक मदत करण्याची मागणी बळीराजा करतो आहे.