हेलो कृषी ऑनलाईन : वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड (Matar Cultivation) केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. हिरवे वाटाणे हवाबंद करून, गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाटाण्यामध्ये कार्बोहाइड्रेट, प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, मेग्निशियम हि खनिजे आणि अ, ब, व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.
वाटाणा लागवडीसाठी (Matar Cultivation) जमिनीची निवड
वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5.5 ते 6.7 इतका असावा. लागवडीपूर्वी उभी आडवी नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. ढेकळे व्यवस्थित फोडून जमीन सपाट करून घ्यावी.
सुधारीत जाती व लागवडीचे अंतर
वाटाणा लागवडीसाठी बोनव्हिला, अरकेल, फुले प्रिया या वाणांची लागवड करावी. वाटाण्याची लागवड रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावी. सरी-वरंबे किंवा सपाट वाफे पद्धतीने लागवडीसाठी 30 × 15 सें.मी. इतके अंतर ठेवावे. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी प्रतिहेक्टरी 30-40 कि.ग्रॅ. बियाणे लागते. तर पेरणी पद्धतीने लागवडीसाठी प्रतिहेक्टरी 70-80 कि.ग्रॅ. बियाणे लागते.
बीजप्रक्रिया व खत व्यवस्थापन
कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियास चोळावे. लागवडीपूर्वी 15:60:60 किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 10 किलो नत्र खताची मात्रा द्यावी. वाटाणा पिकाचा कालावधी वाणानुसार 80 ते 100 दिवसांचा असतो.
रोग व कीड व्यवस्थापन
कीड
वाटाणा पिकावर मावा, शेंगा पोखरणारी आली या किडींचा तर भुरी, मर रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
मावा: हि कीड हिरव्या रंगाची अत्यंत लागण असते. ते पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे निस्तेज बनतात.
शेंगा पोखरणारी अळी: हिरव्या रंगाची हि अळी प्रथम शेंगाची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते.
उपाय – यासाठी मॅलॅथिऑन ५० ईसी, ५०० मिली किंवा फॉस्फॉमिडॉन ८५ डब्ल्यू ईसी, १०० मिली किंवा डायमेथोएन ३० ईसी, ५०० मिली किंवा मिथिलडेमेटॉन २५ ईसी, ४०० मिली, ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी पहिली फवारणी करावी.
रोग
भुरी रोग – या रोगामुळे पिकाचे अतोनात नुकसान होते. या रोगात प्रथम पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरी पावडरीसारखी बुरशी दिसून येते. नंतर ती रोपाच्या सर्व हिरव्या भागावर जलद पसरते व झाडाची उत्पादनक्षमता त्यामुळे खालावते.
उपाय : यासाठी मार्फोलीन २५० मिली किंवा पानाय्त मिसळणारे गंधक 80 टक्के १२५० ग्रॅम किंवा डिनोकॅप ४० डब्ल्यू पी ५०० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा गंधकाची भुकटी ३०० मेश प्रतिहेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी. नंतर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी / धुरळणी करावी. रोगास प्रतिबंधक अशा जातींचा वापर करावा.
मर रोग – या रोगाचा प्रसार जमिनीतील बुरशीमुळे होतो. रोगग्रस्त झाड पिवळे पडून वाळते
उपाय म्हणून पेरणीपूर्वी बियास थायरम हे बुरशीनाशक औषध प्रति किलोस ३ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
वाटाणा पिकाचे वाणपरत्वे हिरव्या शेंगाचे- 4 ते 7 टन तर वाळलेले वाटाणे 1.5 ते 2 टन इतके प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.