हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप पिकांची लागवड झाल्यावर सर्वात मोठ्या प्रमाणात कोणत्या किडीचा (Millipede) प्रादुर्भाव होत असेल तर तो पैसा किडीचा (Paisa Kid). या किडीला वाणी (Vani Kid) किंवा तेलंगी अळी किंवा मिलीपीड (Millipede) अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. ही कीड सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद पिकावर मोठ्या प्रमाणात येते. पैसा/वाणी म्हणजेच मिलीपीड या किडीचा (Kharif Pest) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.
मिलीपीड (Millipede) ही एक निशाचर कीड असून सामान्यत: सडणारी पाने तसेच काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती इत्यादी पदार्थांना खाऊन उपजीविका करते साधारणपणे निसर्गात यांची भूमिका कुजलेल्या काडी कचरा विघटन करण्यास मदत करणारा प्राणी अशी आहे.
परंतु जेव्हा त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणारे रोपटे, अंकुरलेले बियाण्यांना खाऊन नुकसान करतात, जमिनीलगत रोपे कुरतडून टाकतात. पैसा/वाणी किडींनी (Millipede) कुरतडल्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. शेतकरी बांधवांनी जागरूक राहून वेळोवेळी पिकाचे निरीक्षण करून या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Pest Management) करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर.
जीवनक्रम (Millipede Life Cycle)
मिलीपीड (Millipede) किडीच्या अंडी, अळी व प्रौढ या अवस्था आढळून येतात. अंडी जमिनीत काही इंच खोलीवर टाकली जातात. एक मादी साधारणपणे 300 च्या जवळपास अंडी घालते. अळीच्या पाच अवस्था आढळून येतात. प्रौढ अवस्था ही प्रदीर्घ काळाची आहे. संपूर्ण जीवनक्रम हा पाच ते सात वर्षात पूर्ण होतो. या किडीच्या वाढीसाठी जमिनीत आर्द्रता असणे आवश्यक आहे त्यामुळे पावसाळ्यात किंवा जिथे ओलिताची सोय आहे अशा ठिकाणी ही कीड जास्त सक्रिय असते. हवामान अनुकूल नसल्यास ही कीड जमिनीत सुप्त अवस्थेत राहते.
एकात्मिक व्यवस्थापन (Millipede Control Measures)
- शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले काडी कचरा गोळा करून नष्ट करावा.
- वाणी रात्री सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढीगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत.
- शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करून बांधावरील गवत व दगड काढून बांध मोकळा ठेवावा. बऱ्याचदा आर्द्रता, घनदाट पिकात जास्त पाणी दिल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास वाणीचा प्रादुर्भाव वाढतो.
- जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच वाणी मरतात.
- ज्या ठिकाणी शेतकर्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया केली आहे तेथे वाणीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.
- पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतील.
- चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते.
रासायनिक व्यवस्थापन
- कीड (Millipede) संपूर्ण शेतात पसरली असल्यास क्लोरोपायरीफॉस 10 टक्के दाणेदार किंवा फिप्रोनील 0.3% दाणेदार या यापैकी कोणत्या एका कीटकनाशकाची निवड करून 5 किलो प्रति हेक्टर 100 किलो शेण खतात मिसळून ओळीने शेतातील रोपाजवळ वापर करू शकता. (या कीटकनाशकाचा वापर करण्यापूर्वी स्थानिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लेबल क्लेम शिफारसी प्रमाणेच व लेबल क्लेम शिफारस तपासूनच गरज असेल तरच वापर करावा)
- कार्बोफ्युरॉन (3 टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (0.6 टक्के) 4 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरावे.
- आमिष सापळ्यांचा वापर करावा त्यामध्ये गहू पीठ दीड कप + मध दोन चमचे + कार्बोसल्फान 50 मिली + पाणी अर्धा कप प्रमाणात मिश्रण करावे. मिश्रणाच्या गोळ्या करून पोत्याच्या तुकड्यामध्ये बांधून जमिनीत 15 ते 20 ठिकाणी 4 ते 6 इंच खोल गाडाव्यात.
- थायोडिकार्ब 75% WP कीटकनाशक 250 ग्रॅम प्रति एकर अधिक 2 ते 3 किलो धान्याचा कोंडा/ लाकडाचा भुसा/कोरडे शेणखत/लाह्या/ मुरमुरे यामध्ये मिसळून प्रादुर्भावग्रस्त प्लॉट मध्ये पसरून द्याव्यात.