पिकविम्याच्या प्रश्नासाठी आमदार थेट हायकोर्टात ; न्यायालयीन लढाई सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भांत शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पीक विमा कंपनी विरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे. शेतकऱ्यांचं पीक विमा प्रकरण आता मुंबई हायकोर्टात पोहोचलं आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं होतं तरी देखील पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही, असा आरोप करत नांदगाव-मनमाडचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलाय. सुहास कांदे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. हायकोर्टानं विमा कंपनी सोबत केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. 30 ऑगस्ट रोजी या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्ट काय निर्णय देते याकडे हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पीक विम्याचा प्रश्न हायकोर्टात पोहोचला असून गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे 100 टक्के नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. पीक विम्या बाबत सत्ताधारी आमदाराने कोर्टात याचिका दाखल करण्याची ही पहिली घटना मानली जात आहे.

पीक विम्याच्या मागणीसाठी हदगाव शहरात आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत जेल भरो आंदोलन केले. हजारो शेतकऱ्यांनी सोलापूर- नागपूर हायवेवर रास्ता रोको करत हे आंदोलन केलेय. गतवर्षीच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे जबर नुकसान झाले मात्र पीकविमा मिळालाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलय.
हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याने हायवे वरची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती, तर जेलभरो आंदोलनामुळे पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हक्काच्या पीक विम्याच्या मागणीसाठी यापुढेही तीव्र संघर्ष करण्याचा इशारा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिलाय.