हॅलो कृषी ऑनलाईन : चवीला कडू असणाऱ्या कारल्याने येवल्यातील एका शेतकऱ्याला मात्र कारल्याचे उत्पन्न गोड झाले आहे म्हणजेच कारल्यातून चांगले उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे द्राक्षांची बाग तोडून कारल्याचे पीक घेतले आहे. त्यातून कारल्याचे चांगले उत्पन्न या शेतकऱ्याला मिळाले आहे.
येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील शेतकरी नवनाथ लभडे यांनी आपल्या शेतातील द्राक्षाचा बाग तोडून त्याठिकाणी कारल्याचे पीक घेतले. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळला आहे. शेतकरी नवनाथ लभडे यांनी एक एकर शेतामध्ये कारल्याचे पीक घेतलं होतं. या कारल्याचे पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी त्यांना 70 हजार रुपये खर्च आला होता. त्यांनी आतापर्यंत 350 कॅरेट कारले विकले आहे. त्यामुळे त्यांचा सर्व खर्च हा वसूल झाला आहे. तसेच यापुढे अडीच हजाराच्या आसपास कॅरेट कारले विकले, तर त्यातून त्यांना साडेचार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे शेतकऱ्याचे म्हणणं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात कोकण ,पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र येवल्यातील एका शेतकऱ्याला कारल्याच्या पिकामुळे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. द्राक्षाची बाग तोडून शेतात कारले लावलेल्या त्या शेतकऱ्याला लाखोंचा फायदा झाला आहे.