हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी अँप सुरु करण्यात आले आहे. मात्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ई -पीक पाहणीची शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात येऊ नये अशी भूमिका घेत पीक पाहणी कार्यक्रम शासकीय यंत्रणांकडूनचं राबवावा, अशी मागणी करणारं पत्र बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
ई-पीक पाहणी च्या अंमलबजावणी करिता, शेतकऱ्यांवर सक्ती करू नये. राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… pic.twitter.com/RYl28H2xBW
— Office Of Bacchu Kadu (@KaduOffice) September 14, 2021
इंटरनेट सेवेसंदर्भात अडचणी
राज्यात सदस्यस्थितीत शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या पिकांची पीक पाहणी करण्याकरिता ई-पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताचा सर्व्हे, गट नं. एकूण क्षेत्र, पोटखराब क्षेत्र, शेतातील पिके यांची माहिती ई- पीक पाहणी सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यांनीच स्वत: भरुन व फोटो अपलोड करणे बंधनकार करण्यात आलं आहे. मात्र, आजमितीला राज्यातील शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक शेतकरी कुटुंबामध्ये अॅण्ड्राईड फोन नाहीत, असल्यास साधे व केवळ बोलण्यापुरते फोन आहेत. काहीकंडे अॅण्ड्रॉईड फोन असल्यास त्यामध्ये इंटरनेटचा बॅलन्स नाही, सॉफ्टवेअरसाठी लागणारी आवश्यक स्पेस नाही, अशी परिस्थिती आहे. राज्यातील प्रत्येक गावात व खे़डोपाडी इंटरनेट सेवेसंदर्भात अडचणी आहेत. त्यामुळे गरीब आणि अर्धशिक्षिक तसेच सामान्य शेतकरी बांधवांसाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम डोकेदुखी ठरत आहे.ई-पीक पाहणीची माहिती शेतकरी बांधवांनी विहीत मुदतीत न भरल्यास 7/ 12 वरील पिकाचा तक्ता निरंक राहील व शेतकरी बांधव, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसानांचं अनुदान, पीक विमा या सारख्या अनुदानापासून वंचित राहतील, असं संदेश शासकीय यंत्रणेकडून प्रसारित होत असल्यानं संकटात असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. असे या पत्रात म्हंटल आहे.
राज्यातील शेतजमिनी व त्यामधील पिकं यांची पाहणी करणं, आवश्यक नोंदी ठेवणं, या साठी कृषी विभाग व महसूल विभाग शासनाच्या यंत्रणा अस्तित्वात असताना ई पीक पाहणी कार्यक्रम अंमलबजावणी सामान्य शेतकऱ्याकंडून करवून घेणं चुकीचं व अन्यायकारक असल्याचं बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सर्व बाबींचा विचार करुन ई-पीक पाहणी कार्यकमात शेतकऱ्यांकडून माहिती भरून सक्ती न करता पूर्वीप्रमाणं चालत आलेल्या पद्धतीप्रमाणं पीक पाहणी कार्यक्रम शासकीय यंत्रणांकडून राबवा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.