हॅलो कृषी ऑनलाईन : पंढरपूर व परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या जोरदार धारा कोसळल्या.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष आणि बेदाण्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दोन दिवसांपासून पारा चाळीशी पार गेला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.अशातच रात्री अचानक विजांचा गडगडाट व मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव,खर्डी,टाकळी,पुळुज या भागातील काढणीस आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे बेदाण्याचे ही नुकसान होण्याची भिती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
एकीकडे राज्यात तापमान वाढलंय. तर दुसरीकडे सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं सगळ्यांचीच तारांबळ उडवली होती. सोलापुरात झालेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीही धास्तावले आहे. हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावण्याची भीती अवकाळी पावसाच्या येण्यानं आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. वाढलेल्या तापमानात अचानक पाऊस झाल्यानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.