हॅलो कृषी ऑनलाईन : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी जिल्हा पाठोपाठ विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळलया. शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामान होतं काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे.
सध्या काही भागात सकाळपासून ऊन पडत असले तरी दुपारनंतर ढग जमा होत आहेत. अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहत असून काळेकुट्ट ढग भरून येत असून पावसास सुरुवात होत आहे. गुरुवारी वाशीम जिल्ह्यात ठिकाणी वादळ विजांच्या कडकडाट सह जोरात पाऊस पडला. मालेगाव तालुक्यात देखील तुफान पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील दहीहंडी नाल्याच्या आलेल्या पुरात मजुरांसह बैलगाडी वाहून गेली असून मजुरांना वाचविण्यात यश आले तरी दोन बैलांचा मात्र मृत्यू झाला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
कोकणात शेतीच्या कामांना वेग
कोकणातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोकणात भात रोपवाटिकेच्या कामांना चांगलाच वेग आला असून अनेक ठिकाणी मशागतीची कामे देखील अंतिम टप्प्यात आली आहेत. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. तर पूर्व भागात उन्हासह अधूनमधून ढगाळ वातावरण होतं. खानदेशातही पावसाच्या तुरळक सरी पडल्या.