परभणीत अतिवृष्टीची नोंद ; तीन्ही उच्च पातळी बंधाऱ्यांमधून गोदावरीत विसर्ग सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्याला रविवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दुपारी 1 नंतर आलेल्या पावसाने परभणी शहर जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी एकट्या परभणी महसूल मंडळांमध्ये 117 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली .या पावसाने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या उच्च पातळी बंधाऱ्यां मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

रविवारी झालेल्या जोरदार पावसानंतर गोदावरी नदीवर पाथरी तालूक्यात उभारण्यात आलेले तीन्ही उच्च पातळी बंधारे तुडुंब भरले असून यातून रात्री उशीरा व सकाळी गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाथरी तालुक्यात येणारे ढालेगाव ,तारूगव्हाण व मुदगल येथील उच्च पातळी बंधारे 11 जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाने तुडुंब भरले आहेत .रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते तिनही बंधाऱ्यामध्ये पूर्वीच पाणी साठा असल्याने कोणत्याही वेळी पाणी सोडण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्यान ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये पाच मीटर उंचीची पूर्ण क्षमतेची पाणीपातळी निर्माण होत 13.450 दलघमी पाणीसाठा निर्माण झाल्याने बंधाऱ्याचे गेट क्रमांक 8 व 6 पूर्णक्षमतेने उचलत 17 हजार 649 क्‍युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

बंधाऱ्यातून गोदावरीत विसर्ग

गोदावरी नदी पात्रामध्ये उभारण्यात आलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या तारू गव्हाण बंधाऱ्यामध्ये हे पाणी दाखल झाल्यानंतर सकाळी आठ वाजता हा बंधारा 92 टक्के भरला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उच्च पातळी बंधाऱ्याचे एक गट उचलत सुमारे 8हजार 300 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर त्यापाठोपाठ येणारा मुदगल बंधारा 83.58 टक्के भरला असल्याने व बंधाऱ्यातील पाण्याची उंची जोत्यापासून साडेचार मीटर उंच झाल्याने याही बंधाऱ्यामधून एक गेट उचलत 7 हजार 534 क्‍युसेकने सोमवार 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान पाण्याची आवक वाढल्याने तालुका उच्च पातळी बंधाऱ्या मधून सोमवार 12 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणखी एक गेट उचलत 17 हजार 649 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे . अशी माहिती पाटबंधारे उपविभाग पाथरीचे अभियंता दिवाकर खारकर यांनी दिली आहे .