Sahiwal Cow Breed : पुणे कृषी महाविद्यालयास साहिवाल गोवंश संवर्धन प्रकल्प मंजूर; देशातील 4 था प्रकल्प!

Sahiwal Cow Breed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागास साहिवाल गोवंश संवर्धन (Sahiwal Cow Breed) आणि संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकॉर्डिंग युनिट) मंजूर झाले आहे. उत्तरप्रदेशातील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे हे केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे देशातील चौथे माहिती संकलन केंद्र ठरणार असल्याची माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना जातिवंत गायी (Sahiwal Cow Breed) मिळण्यासाठी मदत होणार आहे.

काय आहे प्रमुख उद्देश (Sahiwal Cow Breed)

देशभरात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गोवंशाच्या आनुवंशिक (Sahiwal Cow Breed) क्षमतेचे संवर्धन, संशोधन आणि प्रसार करणे हा या माहिती संकलन प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार आहे. या प्रकल्पामुळे जातिवंत साहिवाल गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढीस मदत होणार आहे. केंद्रीय गाय संशोधन संस्थेमध्ये देशी गोवंशावर संशोधन केले जाते. दुधासाठी प्रसिद्ध साहिवाल, गीर आणि कांकरेज गोवंशाची जातिवंत पैदास, दूध उत्पादनवाढीवर विशेष संशोधन प्रकल्प राबविला जातो.

देशातील चौथे माहिती संकलन केंद्र

प्रकल्पाच्या तांत्रिक कार्यक्रमामध्ये भारतीय कृषी संशोधन संस्था तसेच देशातील विविध कृषी विद्यापीठांचा समावेश आहे. सध्या देशामध्ये तीन प्रमुख माहिती संकलन केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये पशुपालक तसेच सरकारी प्रक्षेत्रावरील जातिवंत दुधाळ देशी गोवंशाची नोंदणी घेतली जाते. जातिवंत पैदाशीच्या माध्यमातून आनुवंशिक सुधारणा केली जाते. संशोधन केंद्रातील उच्च वंशावळीच्या गाईंपासून जन्मलेल्या वळूचा गुणवत्ता चाचणी कार्यक्रमांमध्ये समावेश केला जातो. संशोधन आणि तंत्रज्ञान विस्ताराची गरज लक्षात घेऊन देशातील चौथे माहिती संकलन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठास मंजूर झाले आहे.

काय आहेत ‘या’ गोवंशाची वैशिष्ट्ये :

  • साहिवाल गोवंश हा पंजाब प्रांतातील असून, देशातील सर्वोत्कृष्ट दुधाळ गोवंश आहे.
  • हवामान बदलाच्या काळातही दूध उत्पादनामध्ये सातत्य असते. तसेच जातीच्या जनावरांमध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती असते.
  • या प्रजातीच्या गाई सरासरी 2500 ते 2750 लिटर प्रति वेत दूध देण्यास सक्षम असतात.
  • या प्रजातीच्या गायीच्या दुधाचा फॅट 4.5 ते 4.75 टक्के इतका असतो.