हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या शेतकरी मोठ्या संख्येने रेशीम शेतीकडे (Sericulture Farming) वळत आहेत. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये. यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषांना सरकारकडून हमीभाव दिला जातो. त्यानुसार राज्य सरकारकडून तुती बीज रेशीम कोषांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर टसर रेशीम बीज कोष आणि इतर बीज कोष यांच्या खरेदी दरात देखील सुधारणा करण्यात आली आहे. याबाबतचे दोन शासन निर्णय (जीआर) नुकतेच राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहे. ज्यामुळे आता राज्यातील रेशीम शेती (Sericulture Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेशीम कोषांचे सुधारित दर (Sericulture Farming Increase Silk Fabrics Prices)
राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार, रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना (Sericulture Farming) सध्या प्रति खंडी बीज कोषासाठी 7200 रुपये इतका दर मिळतो. ज्यात 12 हजार रुपये प्रति खंडीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रीलेबल कोषसाठी सध्या 2280 रुपये प्रति खंडी इतका दर मिळतो. ज्यात 7000 हजार रुपये प्रति खंडी इतकी वाढ करण्यात आली आहे. तर दुदरू/गनवाड कोष/पीअसण कोष या कोषांना सध्या 1000 रुपये प्रति खंडी इतका दर मिळतो. जो राज्य सरकारकडून 2000 रुपये प्रति खंडीपर्यंत वाढवण्यात आला आहे. याशिवाय सध्या चलपट कोषांना प्रति खंडी 400 रुपये दर मिळतो. त्यासाठी सरकरकडून प्रति खंडी 1000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
बीजकोष खरेदी दरातही वाढ
दरम्यान, सध्याच्या घडीला रेशीम अंडींपुज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे स्थनिक बीजकोष उत्पादकांकडून तसेच म्हैसूर (कर्नाटक) येथून बीज अंडीपुंज आणून शेतकऱ्यांना पुरवठा केले जाते. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले बीज कोष खरेदी करून अंडीपुंज उत्पादन केले जाते. या बीजकोष खरेदीच्या दरांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. हे दर प्रामुख्याने राज्य सरकारकडून प्युपेशन टक्केवारीनुसार वाढ करण्यात आले आहे. साधारणपणे बी.व्ही.कोषाांचे दर हे टक्केवारीनुसार प्रति किलो मागे 200 रुपयांनी वाढवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना फायदा होणार
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये रेशीम शेतीद्वारे शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीम कोषांचे उत्पादन घेतात. यातील काही शेतकऱ्यांकडून रेशीम बीज कोष उत्पादन देखील घेतले जाते. त्यामुळे आता राज्य सरकारकडून रेशीम कोष आणि रेशीम बीज कोष या दोन्हीच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याने, याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय सध्या रेशीम उत्पादित करणारे शेतकरी देखील रेशीम बीज कोष निर्मितीकडे वळण्यास या दर वाढीमुळे मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जीआर :
(https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202403071056042802.pdf)
(https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202403071058506402.pdf)