सोलापूर बाजार समितीने केले इतर बाजारांना ओव्हरटेक ; पंधरा दिवसात कांद्याची 110 कोटींची उलाढाल

onion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक झाली आहे. आज देखील सोलापूरच्या बाजारात 800 ट्रक कांदा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील 900 ट्रक कांदा आला होता. आवक पाहता 2 दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद होते. आज पुन्हा मोठी आवाक झाली आहे. सकाळी 10 वाजता कांदा व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. उद्या बाजार सुरू ठेवायचं की नाही यावर निर्णय होणार आहे.बाजार समितीच्या इतिहासात वारंवार इतकी मोठी आवक होत असल्यान कांद्याचे दर स्थिर राहतात की कोसळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर बाजार समितीत होत असलेल्या उच्चांकी आवकेमुळे, उच्चांकी बाजार भावामुळे आणि उच्चांकी उलाढालीमुळे अवघ्या काही दिवसातच सोलापूर बाजार समिती कांद्यासाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आल्याचे नजरेस पडत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक नवीन विक्रमाचा तुरा रोवला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या अकरा दिवसात सोलापूर बाजार समितीने भारतातील सर्व नागरिकांनी बाजारपेठांना मागे टाकले आहे. सोलापूर बाजार समितीने आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव, मुंबई तसेच बेंगलोर सारख्या बाजारपेठांना देखील ओव्हरटेक केले आहे. गेल्या पंधरा दिवसात सोलापूर बाजार समितीच्या आवारात सुमारे सात लाख क्विंटल कांद्याची आवक झाली असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे सोलापूर बाजार समितीत राज्यातून तसेच परराज्यातून देखील कांद्याची आवक येत असल्याचे समजत आहे. गेल्या पंधरा दिवसात सोलापूर बाजार समिती मध्ये चक्क 110 कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

110 कोटी रुपयांची उलाढाल

तसं बघायला गेलं तर कांद्याची सर्वात जास्त उलाढाल करण्याच्या बाजारपेठांच्या यादीत मुंबई नाशिक पुणे या बाजारपेठानंतर सोलापूर बाजार समितीचा नंबर लागत असतो मात्र गेल्या काही दिवसात सोलापूर बाजार समितीने या तिन्ही बाजारपेठांना मागे टाकत शीर्ष स्थान पटकावले आहे. देशातील अग्रगण्य कांदा बाजारपेठ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहत ते लासलगाव बाजार समितीच! मात्र गेल्या काही दिवसात आपल्या पारदर्शक व्यवहार याच्या जोरावर शेतकऱ्यांची पहिली पसंत ठरलेली सोलापूर बाजार समितीने आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठला देखील धोबीपछाड देत प्रथम क्रमांक पटकावल्याचे नजरेस पडत आहे. सध्या सोलापूर बाजार समिती मध्ये देशांतर्गत विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते.