हॅलो कृषी ऑनलाईन : अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनचे कार्य अवघ्या देशाला माहिती आहे. पाणी फाउंडेशनच्या जलसंधारणाच्या कामांमुळे अनेक गावांचं रुपडं पालटलं असून पाण्याच्या टंचाईवर कायमचा तोडगा मिळाला आहे. पाणी फाउंडेशनने आता आपला मोर्चा सोयाबीन पिकाकडे वळविला असून सोयाबीन पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आमिर खान यांची टीम आता कामाला लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सोयाबीन शाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली . तसेच सोयाबीन उत्पादन वाढीबाबतच्या पुस्तकाचे प्रकाशन कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
सोयाबीन पिकाकडे शेतकऱयांचा ओढा वाढला आहे. मात्र अद्यापही केवळ ५-६ क्विंटलच उत्पादन प्रति एकरासाठी मिळते. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने तसेच सोयाबीनच्या पेरणी पासून बाजारात नेईपर्यंतचे सर्व मार्गदशन पुस्तकात करण्यात आले आहे. शिवाय दर रविवारी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना मार्ग्दर्शनही केले जात होते. त्याअनुशंगाने राज्यातील 50 हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असल्याचे अमिर खान यांनी सांगितले आहे. शिवाय या मार्गदर्शना दरम्यान, शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणी पासून ते योग्य बाजारपेठ इथपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले होते. राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधकांशी चर्चा आणि प्रत्यक्ष बांधावरची स्थिती काय आहे पाहून या पाणी फाऊंडेशनच्यावतीने एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ज्याचा वापर आता सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी होणार आहे.