परभणीत अचानक आलेल्या पुरामुळे तब्बल २३३ मेंढ्या दगावल्या, मेंढपाळांचं लाखोंचं नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : काल संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त असून तालुक्यातील शिरसी बुद्रुक या ठिकाणी तब्बल 233 मेंढ्या ओढ्याच्या पुरात अडकल्याने मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहा मेंढपाळांच्या या मेंढ्या आहेत. रविवारी (दि.11) रात्री सुरू झालेल्या पावसाने या मेंढ्यांना पुराबाहेर पडण्याची उसंतच दिली नाही. मेंढपाळांनी झाडावर चढून रात्र जागून काढली आणि आपला जीव कसाबसा वाचवला.


काल रात्री झालेल्या पावसाने शहरात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने कुटुंबे बेघर झाली तसेच ग्रामीण भागातही प्रचंड नुकसान झाले आहे. काल सायंकाळी पावसाला उशिरा सुरुवात झाली. शिरसी बुद्रुक या गावी शिवारात दोन ओढे वाहतात. या दोन्ही ओढ्यांना पूर आला आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्याच वेळी दहा मेंढपाळांच्या तब्बल 273 मेंढ्या या शिवारात होत्या. दोन्ही बाजूंनी पाणी असल्याने आपल्या मेंढ्या बाहेर कशा काढाव्यात असा प्रश्न मेंढपाळांना पडला, तोवर पाऊस चालू होता. रात्रीचा अंधार आणि तुफानी पाऊस यामुळे मेंढपाळांनी झाडावर चढून कशीबशी रात्र जागून काढली. आपल्या मेंढ्या मात्र ते वाचवू शकले नाहीत. रात्री या मेंढ्या पुराच्या पाण्यात अडकल्या. त्यांनी आपला जीव वाचवायचा कसाबसा प्रयत्न केला पण मेंढ्यांची ही धडपड निरर्थक ठरली. 273 मेंढ्यापैकी 233 मेंढ्या दगावल्या. या मेंढ्या सांभाळणारे मेंढपाळ रात्रभर लिंबाच्या झाडावर होते. आजुबाजुला सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने त्यांचाही निरुपाय झाला. दरम्यान यासंदर्भातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शिरसी येथील तलाठी यांनी प्रशासनाला कळवला आहे.