हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कारखाने एफआरपी कायद्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल देत नसल्याने 22 जुलै पूर्वी 18 टक्के व्याज दराने शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर च्यावतीने एका निवेदनाद्वारे इंदापुर तहसीलदार यांना देण्यात आला आहे .
2020 – 21 या ऊस गाळप हंगाम मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यातीत येणाऱ्या कर्मवीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना ,नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना ,छत्रपती सहकारी साखर कारखाना या व इतर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे 14 दिवसाच्या आत उसाची बिले अदा करणे सक्तीचे आहे .परंतु सदरील कारखान्यांनी याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे .यामुळे याप्रश्नी बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर आक्रमक झाली असून शेतकऱ्यांना एफआरपी कायद्याप्रमाणे 14 दिवसाच्या आत ऊस बिले आदा न केल्याने 18 टक्के व्याज दराने ते द्यावेत सोबतच कामगारांच्या पगार , ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची बिलेही तात्काळ द्यावीत अशा मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांना 9 जुलै रोजी देण्यात आले आहे .
मागण्या मान्य न झाल्यास 22 जुलै पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर बेमुदत धरणे आंदोलन करेल असा पवित्रा घेतला आहे . निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर उपाध्यक्ष रामदास खराडे, आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे माढा तालुका अध्यक्ष दत्तराज नवले पाटील, माजी जिल्हा संघटक विठ्ठल आबा मस्के, नगोर्ली मा.सरपंच सिद्धेश्वर महाडीक, भारत महाडीक, हरी महाडीक,नवनाथ कदम,मनोहर वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.