Sugarcane Farming : अशा पद्धतीने करा पूर्वहंगामी उसाची लागवड, सुधारित जाती, लागण पद्धत अन बेणे प्रक्रिया समजून घ्या

Sugarcane Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ऊस पिकाची ओळख आहे. महाराष्ट्रात उसाची लागवड सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या तीन हंगामात केली जाते. या तीनही हंगामाची तुलना करता पूर्वहंगाम फायदेशीर असल्याचे दिसून येते.पूर्वहंगामी उसास अनुकूल वातावरण मिळते. त्यामुळे उगवण चांगली होऊन फुटवा दमदार येतो. खरीप हंगामामध्ये इतर पीक घेऊन किंवा पूरबुडीत क्षेत्रामध्ये पूर ओसरल्यानंतर पूर्वहंगामी लागण करता येते. तसचे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणाऱ्या ठिकाणी पूर्वहंगामी ऊस ६ ते ७ महिन्याचा झालेला असल्यामुळे हे पीक पाण्याचा ताण चांगल्या प्रकारे सहन करून शकते. तसेच कीड व रोग यांचा प्रादुर्भाव सुरू व खोडवा उसाच्या तुलनेत कमी राहतो.

जातीवंत रोपे कशी विकत घ्यावीत?

शेतकरी मित्रांनो अनेकदा आपल्याला हवी असणारी जातीवंत रोपे मिळत नाहीत. आपल्या तालुक्यात कोणकोणत्या नर्सरी आहेत अन कोणत्या नर्सरीत कोणते रोप उपलब्ध आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसते. मात्र आता तुमचा हा प्रश्न सुटला आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप तुमच्याकडे असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही रोपवाटिकेतील रोपे सहज ऑर्डर करता येतात. तसेच ज्या रोपवाटिकेत योग्य किंमत आहे तेथूनच तुम्ही रोपे घेऊ शकता. रोपे उपलब्ध आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी तुम्हाला एक दिवस अन पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. फक्त गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप आजच डाउनलोड करून ठेवा. या अँपमध्ये रोपवाटिकांसोबतच तुम्हाला रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा, शेती उपकरणांची खरेदी विक्री आदी सेवा मोफत दिल्या जात आहेत.

उसाची लागवड

पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी. ऊस लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणेच वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी ऊस बेणे बदलावे. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्टरी दोन डोळ्यांची २५,००० टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर १.५ ते २.० फूट व सरीतील अंतर ४ फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी १३,५०० ते १४,००० रोपे लागतील.

जमिनीची निवड व पूर्वमशागत

उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. अशा जमिनीची खोली ५० ते १२० सें.मी. असावी. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्के पेक्षा जास्त असावे. जमिनीची उन्हाळ्यात उभी व आडवी खोल नांगरड करावी. जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कुळवाच्या उभ्या- आडव्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी व जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत १२० ते १५० सें.मी. व मध्यम जमिनीत १०० ते १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ ते ५.० फूट व भारी जमिनीसाठी ३ ते ६ फूट अशा जोडओळ पद्धतीचा अवलंब करावा. पट्टा पद्धतीचा आंतरपीक घेण्यासाठी व ठिबक सिंचनासाठी चांगला उपयोग होतो. यांत्रिक पद्धतीचा (पॉवर टिलर/लहान ट्रॅक्टर) वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर १२० ते १५० सें.मी. (चार ते पाच) फूट ठेवावे.

उसाच्या सुधारीत जाती

पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यासाठी फुले २६५, को ८६०३२ या मध्यम पक्वतेच्या आणि फुले १०००१, को ९४०१२, व्हीएसआर ०८००५ आणि कोल्हापूर विभागासाठी को ९२००५ या सुधारीत व अधिक ऊस आणि साखर उतारा देणार्‍या जातींची निवड करावी. लागणीसाठी बेणेमळ्यात वाढविलेले ९ ते १० महिने वयाचे निरोगी, रसरशीत, लांब कांड्याचे आणि फुगीर डोळ्याचे शुद्ध बेणे वापरावे. अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. अलीकडे गवताळ वाढ, पिवळसर पानाचा रोग, लालकूज यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे बियाणे बेणेमळ्यात वाढविलेले निरोगी बेणे वापरावे. खात्रीशीर रोपवाटिकेतूनच रोपे घ्यावीत. रोगग्रस्त बियाणे वापरून रोपे तयार केल्यास रोगाचा फैलाव झपाट्याने होत असल्याचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आढळून आले आहे.

पारंपरिक पद्धतीने ऊस लागण

तीन फूट अंतरावर सर्‍या काढून सवाई/ दिडकीने लागण केल्याने फुटव्यांची संख्या जास्त घेऊन मर जास्त प्रमाणात होते व उत्पादनात घट येते. पाण्याचा जास्त वापर होतो. आवश्यकतेपेक्षा एकरी उसाची संख्या जास्त राहून ऊस बारीक होतो. उसाला योग्य सूर्यप्रकाश, हवा मिळत नसल्याने उत्पादनात घट येते.

लांब सरी पद्धतीने ऊस लागण

या लागण पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवता येते. हलक्या जमिनीत तीन फूट अंतरावर सरी पाडावी व भारी जमिनीमध्ये ३.२५ ते ४.० फूट अंतरावर सरी पाडावी. जमिनीच्या उतारानुसार ४० ते ६० मीटर पर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना २ ते ३ सर्‍यांना एकत्र पाणी द्यावे. जमिनीचा उतार ०.३ ते ०.४ टक्के पर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी व उतार ०.४ टक्के पेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सर्‍या पाडून ऊस लागण करावी.

या पद्धतीमध्ये आवश्यक तेवढेच पाणी देता येते. त्यामुळे जमिनी खराब होण्याचे प्रमाण कमी होते. पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरी मुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो व उत्पादनात वाढ होते. आंतरमशागत सुलभतेने करता येते.

पट्टा पद्धतीने ऊस लागण (२.५ × ५ फूट किंवा ३ × ६ फूट)

जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्या जमिनीत २.५ फूट व मध्यम ते भारी जमिनीत ३ फूट अंतरावर अंतरावर रिझरच्या सहाय्याने सलग सर्‍या पाडून दोन सर्‍यामध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळीत ५ फूट किंवा ६ फूट पट्टा रिकामा राहील.
भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते. ऊस पिकावर अनिष्ट परिणाम न होता आंतर पिकाचे उत्पादन मिळते व तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे. ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे. कारण यात यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते. पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते. ऊस बांधणीनंतर दोन ओळी मध्ये एक सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजविता येतात. त्यामुळे पाण्याची ३०-३५ टक्के बचत होते.

रुंद सरी पद्धतीने ऊस लागण

या लागण पद्धतीमध्ये दोन सरीतील अंतर ४ फूट, ४.५ फूट किंवा ५ फूट ठेवले जाते. जमिनीच्या उतारानुसार ४० ते ६० मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. जमिनीचा उतार ०.३ ते ०.४ टक्के पर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी व उतार ०.४ टक्के पेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सर्‍या पाडून ऊस लागण करावी. या लागण पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. ही पद्धत यांत्रिकीकरणासाठी योग्य आहे. यामध्ये यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते, आंतरमशागत सुलभतेने करता येते. रुंंद सरीमुळे ऊस पिकामध्ये आंतरपीक घेणे शक्य होते.

बेणे प्रक्रिया

लागणीसाठी बेणेमळ्यात वाढविलेले ९ ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. काणी रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खवले कीड व पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी १०० ग्रॅम कार्बेंडॅझिम व ३०० मि.ली. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट १०० लीटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर अ‍ॅसिटोबॅक्टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत १.२५ किलो १०० लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणू खताच्या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते व उत्पादनात वाढ होते.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.