हेलो कृषी ऑनलाईन : दिवसेंदिवस खाद्यतेलाची मागणी वाढत आहे. जागतिक पातळीवर सोयाबीन, मोहरी, भुईमूग या पिकानंतर सूर्यफूल (Sunflower Cultivation) हे चौथ्या क्रमांकाचे तेलबिया पिक आहे. या पिकाची लागवड खरीप तसेच रब्बी हंगमातही केली जाते. आपल्या देशात कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश ही प्रमुख सूर्यफूल उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रातील बरेच शेतकरी या पिकाच्या लागवडीकडे वळत आहेत. सूर्यफूल पिकाच्या लागवडीची महिती आपण जाणून घेऊया.
सूर्यफूल लागवडीसाठी (Sunflower Cultivation) पूर्वमशागत व लागवडीचा हंगाम
पेरणीआधी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या आडव्या-उभ्या पाळ्या द्याव्यात. कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. बियाणे 5 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती सूर्यफुलाची लागवड सरी-वरंब्यावर टोकन पद्धतीने करावी. मध्यम ते खोल जमिनीत अंतर 45 × 30 सें.मी. तर भारी जमिनीत 60 × 30 सें.मी. ठेवावे.
रब्बी हंगामात कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी 15 ऑक्टोबर पूर्वी करावी. तसेच बागायती सूर्यफुलाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी.
सूर्यफूल लागवडीसाठी (Sunflower Cultivation) पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक घेऊ नये.
बीजप्रक्रिया व पिकाचे वाण
पेरणीसाठी सुधारित बियाणांचे वाण 8 ते 10 कि.ग्रॅ. तर संकरित बियाणे 5 ते 6 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी वापरावे. मर रोगाच्या प्रतिबंधासाठी प्रतिकिलो बियाणास 2 ते 2.5 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी.
सुधारीत वाण–
एस.एस. 56 : कमी कालावधीत येणारे हे वाण असून अवर्षणग्रस्त भागात या वाणाची लागवड करावी. हे वाण 80 ते 85 दिवसांत तयार होते. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 9 ते 10 क्विंटल उत्पादन मिळते.
मॉडर्न : हे वाण उशिरा पेरणीसाठी योग्य असून पिकाची उंची कमी असते. सरासरी प्रतिहेक्टरी 7 ते 8 क्विंटल इतके उत्पादन मिळते.
भानू : हे सूर्यफुलाचे वाण कोणत्याही हंगामात घेता येते. हे वाण 85 ते 90 दिवसांत तयार होते. प्रतिहेक्टरी 12 ते 13 क्विंटल उत्पादन मिळते.
संकरित वाण–
के.बी.एस.एच. 1 : या वाणामध्ये तेलाचे प्रमाण व उत्पादनक्षमता अधिक आहे. 85 ते 90 दिवसांत तयार होते. 12 ते 14 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते.
एल.एस.एच-35 : अधिक उत्पादनक्षमता, केवडा रोगास प्रतिकारक हे वाण आहे. 90 ते 95 दिवसात तयार होते. प्रति हेक्टरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते.
एल.एस.एफ.एच 171 : या वाणाची लागवड कोरडवाहू तसेच बागायतीसाठी करता येते.
सूर्यफुलाची आंतरपीक म्हणून लागवड करायची असल्यास तूर आणि भुईमूग या पिकामध्ये करावी.
खत व्यवस्थापन
जमिनीची पूर्वमशागत करताना लागवडीपूर्वी प्रतिहेक्टरी 2.5 टन शेणखत टाकावे. कोरडवाहू पिकासाठी माती परीक्षणानुसार हेक्टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश हे खत वेळी दोन चाड्याच्या पाभरीने पेरणीच्या वेळी द्यावे. बागायती पिकासाठी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, 30 किलो पालाश द्यावे. यापैकी पेरणीच्या वेळी 30 किलो द्यावे. व पेरणीनंतर 1 महिन्याने उर्वरित 30 किलो नत्र द्यावे.
मशागत व पाणी व्यवस्थापन
पेरणीनंतर 15 दिवसांनी सूर्यफुलाची विरळणी करावी. दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. आवश्यकतेनुसार एक ते दोन खुरपण्या कराव्या. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी एक आणि 35 ते 40 दिवसांनी एक अशा दोन कोळपण्या कराव्यात.
पिकाची रोपावस्था, फुलकळी, फुलोरा व दाणे भरताना अशा वाढीच्या अवस्थांमध्ये पिकाला पाणी द्यावे.
कृत्रिम परागीभवन
पिकामध्ये दाणे भरण्यासाठी फुलाचे परागीभवन होणे आवश्यक असते. कृत्रिम परागीभवन करण्यासाठी हाताच्या पंजाला तलम कापड गुंडाळून सकाळी 6 ते 11 या वेळेत दर दिवसाआड तीन ते चार वेळा पिकावरून हळूवार हात फिरवावा. मधमाश्यांच्या चार ते पाच पेट्या एक हेक्टर पिकात ठेवाव्यात.