हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षांपासून लहरी निसर्गाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना झाला आहे. कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट , तर कधी अति थंडी आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकावर परिणाम होऊन उत्पादनात घट होत आहे. सध्या रब्बीचा हंगाम जोमात असून यंदा हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. हरभऱ्याचे पीक सध्या काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र वातावरण बदलण्याचे संकेत आहेत त्यामुळेच काढणी झालेल्या मालाच्या लागलीच राशी लावल्या जात आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका टळतो आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पेरण्या झाल्या होत्या. त्या पिकांच्या आता राशी सुरु आहेत.
उत्पादन घटू नये याकरिता शेतकरी सावध पवित्र्यात
सध्या तूर कापूस आणि सोयाबीन या तिन्ही पिकांना चांगला दर मिळतो आहे. मात्र बदलत्या वातावरणामुळे तिन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दर चांगला असूनही सरतेशेवटी जितके पैसे शेतकऱ्यांच्या हाती यायला पाहिजे होते तितके येत नाहीयेत. त्यामुळे रब्बीच्या हरभऱ्याच्या बाबतीत चांगलाच धडा घेत काढणी झाल्यावर लागलीच मालाच्या राशी लावल्या जात आहेत. सध्या पुन्हा ढगाळ वातावरण होते आहे. तसेच गारठा हि आहे त्यामुळे शेतकरी सध्या हवामानाच्या बाबतीत सावध पवित्र्यात आहे.
तुरीप्रमाणेच हरभऱ्यासाठीही हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. शिवाय बाजारपेठेतले दर आणि हमीभाव यामध्ये जवळपास 700 रुपायांचा फरक येत असल्याने शेतकरी हे हमीभाव केंद्राचाच आधार घेत आहेत. त्यामुळे बाजारपेठमध्ये 2 ते 3 हजार क्विंटलचीच आवक सुरु आहे. हरभऱ्यासाठी शासनाचा हमीभाव हा 5 हजार 230 एवढा आहे. त्यामुळे नोंदणी आणि हमीभाव केंद्रावरच विक्री हाच पर्याय शेतकरी निवडत आहे.