हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार उत्तर मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियस ने वाढ होण्याची शक्यता आहे.सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून जमिनितील ओलावा कमी झालेला असल्यामूळे पिकाच्या संवेदनशील अवस्थेनूसार पिकास पाणी देण्याची आवश्यकता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
फळबाग व्यवस्थापन :
१)केळी : आधीच बदलत्या हवामानामुळे केली पिकावर मोठा परिणाम झाला आहे. केळीचे व्यवस्थापन करण्याकरिता केळी बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल.
२)आंबा : आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३)द्राक्ष : द्राक्ष बागेत भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी सल्फर (40 एस.सी) या फॉर्म्यूलेशनचा 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापर करावा. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
पीक व्यवस्थापन
१) रब्बी ज्वारी : उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)उन्हाळी भूईमूग : उन्हाळी भूईमूग पिकाची पेरणी केली नसल्यास लवकरात लवकर पेरणी करून घ्यावी. उन्हाळी भुईमूग पिकास पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे नंतर द्रव्यरूपी रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) संवर्धके प्रत्येकी 10 मिली प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी.
३)करडई : करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.