लोडशेडिंग हे ऊर्जा खात्याचे अपयश ; राजू शेट्टींनी दिला आंदोलनाचा इशारा

electricity
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या वर गेला आहे . अशात राज्यातल्या शेतकऱ्यांना आता खंडित विजापुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. ऐन उन्हाळयात पिकं करपून जाण्याची वेळ आली आहे. याच या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोडशेडिंग हे ऊर्जा खात्याचे अपयश

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले , सध्या राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानात सातत्याने वाढ होते आहे. राज्यात विजेची मागणी वाढत आहे. दरम्यान, यावर्षीचा उन्हाळा कडक असणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढणार, याची पूर्वकल्पना असलेल्या महावितरणने तशी पूर्वतयारी करायला हवी होती. विजेचा वापर वाढणार,नागरी क्षेत्रात आणि कृषी क्षेत्राकडूनही विजेचा वापर वाढणार, हे राज्य सरकारसह महावितरणलाही ठाऊक होते.वाढत्या मागणीचे नियोजन करणे ही महावितरणची जबाबदारी होती. मात्र महावितरण आणि महाजेन्को यांच्यात समन्वयाचा फटका सध्या जनतेला बसत असल्याचे शेट्टी म्हणाले आहेत. लोडशेडिंग हे ऊर्जा खात्याचे अपयश आहे. त्यांनी विजेचे नियोजन केले नाही. म्हणून आज टंचाई भासत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना जी ८ तासांची वीज मिळत होती, ती वीज आता जेमतेम तीन ते साडेतीन तास मिळत आहे. उभी पिकं डोळ्यादेखत करपू लागली आहेत. सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरु आहे, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. लोडशेडिंगचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसतो त्यामुळे ग्रामीण भागातील लोडशेडिंग थांबवण्याची मागणी करत शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.