हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी प्रतिनिधी
येणारा 2022-23 चा ऊस गळीत हंगाम उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी धोकादायक असून शेतकऱ्यांनी ऊसाचे क्षेत्र कमी करावे ,कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घ्याव असे आवाहन मा .आ . माणिकराव आंबेगावकर यांनी केले आहे. येत्या हंगामात शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन घ्यावे की नाही ?ऊस समस्येबाबत समाधान काय ?या विषयावर रविवार 1 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता परभणी जिल्ह्यातील पाथरी विश्रामगृह येथे माजी आ. माणिकराव आंबेगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ऊस पिक ,साखर कारखाना ,ऊस उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात भाष्य करत असताना ते बोलत होते .मा.आ.आंबेगावकर म्हणाले की , या वर्षी एप्रिल ,मे पर्यंत पाथरी तालुक्यातील सर्व ऊस गाळपासाठी जाणार यासंदर्भात मी सुरुवातीलाच अंदाज दिला होता .सध्या पाथरी तालुक्यातील दोन साखर कारखाने सोडता 5 हजार टन प्रति दिवस ऊस इतर कारखान्याला गाळपासाठी जात आहे .त्यामुळे 25 मे पर्यंत तालुक्यातील सर्व ऊस तुटणार आहे .परंतु 2022 – 23 चा ऊस गळीत हंगाम शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरणार आहे .त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच ऊसाची लागवड कमी करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एप्रिल मे मध्ये साखर कारखान्याला गेलेल्या उसाचे क्षेत्र शेतकऱ्यांनी मोडीत काढत या ठिकाणी सोयाबीन व इतर पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी करावी याशिवाय येत्या हंगामात ऊस लागवड साखर कारखाना नोंद घेत असेल तरच करावी ,उसाचे कमी क्षेत्र ठेवत अधिक उत्पादन काढावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला .
पाथरी येथील साखर कारखान्याच्या गाळप क्षमता वाढी संदर्भात भाष्य करताना ते म्हणाले की ,अशा स्वरूपाची शक्यता कमी आहे परंतु समजा परवानगी मिळाली तरी गाळप क्षमता वाढवण्याच्या तांत्रिक कामाला सुमारे दोन वर्षापर्यंत कालावधी लागू शकतो त्यामुळे कारखाना गाळप वाढविण्यासंदर्भात प्रयत्न झाले तरी पुढील हंगामात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही. एकंदरीत या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून यातून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पुढील वर्षी ऊस उत्पादनाकडे न वळता इतर पिके घेतल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार नाहीत असा एकूण त्यांच्या बोलण्याचा सुर होता .