हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपाबाबत शेतकरी चिंतेत आहे. कारण जून महिना कोरडाच गेला त्यानंतर मोठ्या धास्तीने पेरणी केली मात्र कोवळी पिके आल्यावर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यामुळे काही ठिकाणी पिके वाहून गेली तर काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या. त्यातूनही उरलं सूरलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करतो आहे. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती घेऊया…
१) सोयाबीन
सोयाबीन पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) : याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2 ची 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पहिल्या फवारणीने पाने हिरवी न झाल्यास परत आठ दिवसांनी दूसरी फवारणी करावी.
शंखी गोगलगाय : सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.
२) कापूस
कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
मावा, तूडतूडे : कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
आकस्मिक मर किंवा मूळकुज : कापूस पिकात आकस्मिक मर किंवा मूळकुज दिसून असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे.
शंखी गोगलगाय : सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.