हॅलो कृषी ऑनलाईन : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या विसर्जनाला राज्यात पावसाचीही (Weather Update) दमदार हजेरी राहणार आहे. सध्या मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात विजा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसतो आहे. दरम्यान आज दिनांक ९ रोजी दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान स्थिती
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत (Weather Update) आला असून, हा पट्टा जैसलमेर, भोपाळ, गोंदिया जगदलपूर, कलिंगापट्टणम, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व- मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण कोकणापासून उपसागरातील कमी दाब प्रणाली पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
आज या भागात अलर्ट
आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. पुणे, सातारा विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर ठाणे, मुंबई. , नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. या भागाला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.