हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशातील रासायनिक खतांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र रासायनिक खतांच्या (Compost Khat) वाढत्या वापरामुळे, जमिनीचा पोत तर खराब होतोच. शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होते. मात्र तुम्ही सेंद्रिय पद्धतीने कंपोस्ट खताची निर्मिती करून हा खर्च पूर्णपणे वाचवू शकतात. कंपोस्ट खताची निर्मिती नेमक्या कोणत्या वस्तूंपासून करावी आणि कोणत्या गोष्टींपासून करू नये. योग्य माहितीच्या आधारे तुम्ही कंपोस्ट खतनिर्मितीचा (Compost Khat) व्यवसाय देखील सुरु करू शकता, चला तर मग जाणून घेऊ या कशी केली जाते सेंद्रिय पद्धतीने कंपोस्ट खताची निर्मिती…
देशातील अनेक भागांमध्ये शेतकरी सध्या कंपोस्ट खताचा (Compost Khat) वापर करत शेती करत आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत आहे. कंपोस्ट खत निर्मिती करताना प्रामुख्याने सर्व नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जातो. या खताच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन, उत्पादनातही मोठी वाढ होते. त्यामुळे कंपोस्ट खत निर्मितीचा उद्योग हा चिरंतन काळ चालणारा उद्योग ठरू शकतो. त्याचे मॉडेल विकसित केल्यास तुम्हाला मोठ्या कालावधीपर्यंत फायदा होऊ शकतो.
कंपोस्ट खत निर्मितीसाठी उपयोगी वस्तू (Compost Khat Business Model)
सध्या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. ज्यामुळे पिकांच्या उत्पादन क्षमतेवरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे फळबाग आणि सर्वच शेतकऱ्यांकडून या खताला विशेष मागणी असते. तुम्ही प्रामुख्याने शेतांमधील गवत, पिकांमधील काढलेले गवत तसेच उपलब्ध होणाऱ्या सर्वच गवतांपासून कंपोस्ट खत तयार करू शकता. याशिवाय झाडांची पाने, पालापाचोळा, शेतातील पिकांचे मागे राहिलेले अवशेष, खराब झालेली फळपिके आणि भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती केली जाऊ शकते. याशिवाय जनावरांचे मलमूत्र, शेण, शेतातील काडी-कचराही कंपोस्ट खत निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो.
कोणत्या वस्तूंचा वापर करू नये
तुम्हाला जर कंपोस्ट खत निर्मिती करायची असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने जनावरांचे मांस, हाडे आणि मासे किंवा जनावरांच्या अवशेषांपासून कंपोस्ट खत निर्मिती करणे टाळावे. याशिवाय जनावरांची चरबी, खराब झालेली डेअरी उत्पादने, खराब झालेले अन्नधान्य यापासून कंपोस्ट खत निर्मिती करू नये. या वस्तूंपासून बनलेले कंपोस्ट खत हे पिकांना हानिकारक असते.
कंपोस्ट खताचे फायदे
- कंपोस्ट खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
- मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. ज्यामुळे पिकांच्या मुळाशी कायम गारवा निर्माण होतो
- परिणामी सिंचन करण्याची गरज कमी असते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
- कंपोस्ट खतामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे पिकांची जोमदार वाढ होते.
- पिके किंवा अन्नधान्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. त्यामुळे ग्राहकांकडून त्यास मागणी असते. आणि दरही चांगला मिळतो.
- जमिनीमध्ये कंपोस्ट खतांचा सतत वापर केल्यास माळरान जमीनही बागायती जमिनीचे स्वरूप धारण करून चांगले उत्पादन देते.
- कंपोस्ट खताच्या निर्मितीदरम्यान कोणत्याही रसायनांचा वापर करू नये.