Crop Insurance : ‘…एफआयआर दाखल करतो’, पीक विम्यावरून कृषिमंत्री मुंडे संतापले!

Crop Insurance Agri Minister Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याचे अनेक तक्रारींमध्ये शेतकऱ्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) न दिल्यास, मी कंपनीविरोधात एफआयआर दाखल करिन. अशा शब्दांत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

40 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी (Crop Insurance Agri Minister Munde)

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला होता. यासाठी या शेतकऱ्यांनी मुंबईत आंदोलन देखील केले होते. हदगाव तालुक्यातील जवळपास 80 हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला असून, त्यातील निम्म्या अर्थात 40 हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या कृषिमंत्र्यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

सर्व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्या!

शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करताना कोणते निकष लावले? मोजक्याच शेतकऱ्यांना जसा विम्याचा लाभ दिला तसा सर्व शेतकऱ्यांना द्या. नाही तर कंपनीविरुद्ध मी एफआयआर दाखल करतो, असा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बैठकीला उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच, याबाबत पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता तक्रारदार शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याबाबत दिलासा मिळणार आहे.

मुंबईत पार पडलेल्या या बैठकीला मंत्री संदिपान भुमरे, खासदार हेमंत पाटील, बाबुराव कदम, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विभागीय कृषी आयुक्त आवटे, जिल्हा कृषी अधिकारी बन्हाटे, हदगावचे शेतकरी नेते गजानन शिंदे व आत्माराम पाटील, शिवाजीराव जाधव, संदीप पालकर, नागोराव पाटील, अविनाश पाटील, रवीकुमार सूर्यवंशी, राजू पाटील हेही उपस्थित होते.