हॅलो कृषी ऑनलाईन: राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान कोरडवाहू क्षेत्र विकास (National Mission for Sustainable Agriculture) या अंतर्गत प्रामुख्याने सिंचनाखाली न येणाऱ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन कृषी उत्पादन वाढविणे, कोरडवाहू क्षेत्राचा विकास करणे आणि उत्पादकतेत वाढ करुन नविन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करून देणे तसेच हवामानातील अनपेक्षित बदलामुळे होणारे नुकसान, पूर ,तसेच दुष्काळ या नैसर्गिक घटकांमुळे पिकाचे होणारे नुकसान टाळणे हे या अभियानाचे (National Mission for Sustainable Agriculture) उद्दिष्ट आहेत.
प्रत्येक उपविभागातून दोन गावे प्रकल्प क्षेत्र म्हणून निवडण्यात येतील. त्या गावामध्ये लाभ द्यावयाचे क्षेत्र किमान 100 हेक्टर असावे लागते. या योजनेअंतर्गत (NMSA) फलोत्पादन शेती, हरीत गृह, शेळी मेंढी खरेदी/कुकुट पालन, मुरघास यूनिट,गायी/म्हशी खरेदीसाठी, मधुमक्षिका संच, हिरवळीचे खत निर्मिती, शेडनेट हाऊस, गांडूळ खत यूनिट इत्यादी घटकांवर २ हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांनाही घेता येईल. याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत (National Mission for Sustainable Agriculture) .
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान कोरडवाहू क्षेत्र विकास या अंतर्गत खालील घटकांवर अनुदान देण्यात येते (National Mission for Sustainable Agriculture)
शेळी, मेंढी खरेदी/कुकुट पालनासाठी पक्षी खरेदीसाठी अनुदान
10 शेळ्या/मेंढ्या (त्यामध्ये 9 शेळ्या/मेंढ्या आणि 1 बोकड/मेंढा नर) आणि एक वर्षासाठीचे खुराक तसेच एक हेक्टर मिश्र पिक पद्धती व चारा पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक निविष्ठा
किंवा 50 पक्षी आणि एक वर्षासाठी प्राण्यांचे खुराक हे एक हेक्टर मिश्र पिक पद्धती व चारा पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक निविष्ठा
वरिलपैकी एका पद्धती साठी लागणारे एकत्रित खर्चाच्या 50% व जास्तीत जास्त रु.25000 प्रति हेक्टर याप्रमाणे प्रति लाभार्थी 2 हेक्टर च्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. पक्षी खरेदी शासन प्राधिकृत संस्थेमार्फत करण्यात येते. शेळ्या/पक्षांचा 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात येतो. खरेदी नंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थ्याने करावयाचा. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जिल्हास्तरावरुन वितरित करण्यात येते.
गायी/म्हशी खरेदीसाठी अनुदान
यामध्ये 2 गायी/म्हशी खरेदीसाठी प्रति लाभार्थी 2 हेक्टर च्या मर्यादेत रु.40,000 प्रति हेक्टर याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. गायी/म्हशी खरेदी जिल्ह्याबाहेरुन /राज्याबाहेरुन करण्यात येते. यामध्ये जनावराचा 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात येतो. वाहतुकीचा खर्च लाभार्थ्याने करावयाचा असतो.
- मुरघास यूनिट
जनावरांच्या हिरव्या चाराची गरज भागविण्यासाठी मुरघास यूनिट उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते. यासाठी खर्चाच्या 100% कमाल रु. 1,25000 प्रति लाभार्थी अनुदान देण्यात येईल . लाभार्थ्याकडे किमान 10 जनावरे असणे गरजेचे आहे.
- फलोत्पादन शेती
यामध्ये फळपीके, भाजीपाला, फुले व अन्नधान्य पिके या घटकांचा समावेश करुन अनुकूल शेती पद्धती विकसित करण्यात येणार आहे. यासाठी खर्चाच्या 50% रु.25000 प्रति हेक्टर प्रमाणे प्रति लाभार्थी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येते.
हरीतगृह
हरीतगृह रोपांची वाढ करणे व रोपवाटिका तयार करणे, उच्च प्रतिच्या फुलांच्या उत्पादनासाठी , हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी करण्यात येतो. हरीतगृह घटकासाठी खर्चाच्या 50% अनुदान देय आहे.
- शेडनेट हाऊस
शेडनेट हाऊस घटकासाठी खर्चाच्या 50% अनुदान देय आहे.
- मधुमक्षिका संच
मधुमक्षिका संच घटकासाठी खर्चाच्या 40% अनुदाय देय आहे.
ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्डाची झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- जातीचा दाखला (अनुसूचित जाती/ अनुजमातीच्या शेतकऱ्यांसाठी)
- आधार कार्ड लिंक असलेल्या बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स
- 7/12 व 8 अ प्रमाणपत्र
लाभासाठी अर्ज कुठे करावा (National Mission for Sustainable Agriculture)
http://www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे ऑनलाईन अर्जाच्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.