Poultry Farming: कोंबड्या कमी अंडी देत आहेत? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मुक्त कोंबडीपालन (Poultry Farming) पद्धती मध्ये अंड्याचे किमान 40% आणि कमाल 65% उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोंबड्यामागे कमीत कमी 40 अंडी मिळायला हवीत तरच व्यावसायिक स्वरूपात हा धंदा परवडतो. परंतु काही कारणांमुळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. कमी प्रमाणात अंडी उत्पादन (Egg Production) यामागील करणे आणि त्यावर करायचे उपाय जाणून घेऊ या.  

कोंबड्यांत कमी अंडी उत्पादनांचे कारणे (Reasons For Less Egg Production)

  • कोंबड्या या त्या त्या वयाच्या कळपामध्ये राहणे पसंत करतात. मोठ्या कोंबड्या लहान पिलाना पिल्लांना चोच मारुन जखमी करतात किंवा पाठीवरील पिसे उपसतात. संघर्षामुळे कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो त्यामुळे अंडी उत्पादन कमी होते. म्हणून शक्यतो एकाच वयाच्या कोंबड्यांचा किंवा पिल्लांचा कळप असावा. वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्यांना एकत्र मिसळू नये.
  • पोल्ट्रीफार्म (Poultry Farm) जवळ कुत्र्यांचे भुंकणे, मांजराचे ओरडणे, हिंस्र प्राण्यांचा वावर, वाहनांचा आवाज, गोठ्यात अनोळखी व्यक्तीचा प्रवेश यामुळे कोंबड्यांवर ताण येवून अंडी उत्पादनावर परिणाम होतो यासाठी पोल्ट्रीफार्म मुख्य रस्त्या पासून सुरक्षित दूर अंतरावर असावे, जेणेकरून आवाजाचा कमी त्रास होईल. विशेषतः अंड्यांवरील कोंबड्यांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी.
  • उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अंडी उत्पादन घटते. अशावेळी कोंबड्याना थंड पाण्याचा पुरवठा करावा, तसेच ताण कमी करण्याची औषधे द्यावीत, शेड मधे हवा खेळती ठेवावी.  
  • पक्षांना राहण्यासाठी अपुरी जागा असेल तर आजार लवकर पसरतात. प्रति पक्षी किमान 4 ते 5 वर्ग फुट जागा असावी. मुक्त पद्धत असेल तर रात्रीच्या निवाऱ्यासाठी किमान 2 वर्ग फुट जागा प्रति पक्षी उपलब्ध करून द्यावी.
  • लसिकरण (poultry vaccination) करताना कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो आणि अंडी उत्पादन कमी होते. लस दिल्यानंतर नेहमी कोंबड्याना ताण कमी करणारी औषधे आणि लिवर टॉनिक्स द्यावीत.
  • आजार पसरल्यास अंडी उत्पादनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे वरचेवर कोंबड्याना जंत नाशक औषध द्यावीत, लीटर हे नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. त्यात 10% चुना मिक्स करावा.
  • कोंबडी ही नेहमी अंधाऱ्या आणि एकांत असणाऱ्या सुरक्षित जागी अंडी देणे पसंत करते. त्या दृष्टीने प्रति 6 ते 8 पक्षी एक अंडी देण्याचे खोके/नेस्ट बॉक्स ठेवावे.
  • अंडयावरील कोंबड्यांना सतत स्वच्छ, निर्जंतुक आणि मुबलक पाणी पिण्यास द्यावे.
  • पाण्याची भांडी ही वारंवार स्वच्छ करावीत. शक्यतो पाणी स्वच्छ सुती कपड्याने गाळून घ्यावे. तसेच पाण्यात ई कोलाई किंवा सालमोनेला या आजारांच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घ्यावी.
  • कोंबड्यांना संतुलित आहार दिला नाही तर अंडी उत्पादनावर परिणाम होतो. अंडी उत्पादन सुरु होताच म्हणजे 20 ते 22 आठवडे वय असताना कोंबड्याना उच्च प्रथिने (16%) आणि ऊर्जा युक्त संतुलित आहार पुरवावा. मुक्त पद्धत असेल तर नैसर्गिक कीडे, मुंगी, गवत आणि इतर नैसर्गिक आहार यांच्या व्यतिरिक्त प्रति पक्षी किमान 80 ते 90 ग्रॅम संतुलित आहार द्यावा.
  • कोंबड्यांना आहारातून योग्य खनिजांचा पुरवठा न झाल्यास कमी अंडी उत्पादन, कवच विरहित अंड, कमकुवत कवच असणारी व लगेच फुटणारी अंडी देणे या समस्या उद्भवतात. अंडी देणाऱ्या कोंबड्यांना संतुलित आहारा सोबत किमान 5% अतिरिक्त कॅल्शिअम द्यावे. बाजारात उपलब्ध असलेली खनिज मिश्रण/ कॅल्शिअम कार्बोनेटचा किंवा शिंपल्याचा चुरा तसेच पाण्यात मिसळलेला कळीचा चुना देखील कॅल्शिअमचा चांगला पर्याय आहे.
  • कोंबड्याना उच्च अंडी उत्पादन देण्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात प्रकाश उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. अंडयावर आलेल्या कोंबड्यांना दिवसातील किमान 16 तास सलग प्रकाश दिसायला हवा. यादृष्टीने दिवसा नैसर्गिक सूर्यप्रकाश किती तास असतो याचा अभ्यास करून कृत्रिम प्रकाश पुरवावा लागतो. म्हणजे 12 तास सूर्य प्रकाश असेल तर 4 तास कृत्रिम प्रकाश पुरवावा. त्या प्रकाशाची तीव्रता शेडमध्ये सहज वर्तमानपत्र वाचता येईल एवढीच असावी.
  • पोल्ट्रीफार्म (Poultry Farm)धारकांनी फार्म वर दिवसातून किमान 3 ते 4 वेळा अंडी गोळा करावीत. अंडी लवकर गोळा न केल्यास केव्हा तरी अपघाताने अंडे फुटते आणि कोंबड्याना अंडे खायची सवय लागते, ही विकृति वाढल्यास कोंबड्या स्वतः ची अंडी फोडून खायला सुरुवात करतात. साहजिकच अंडी उत्पादन घटते.
  • अंडयावरील कोंबडी ही वजनाने हलकी असावी. अती वजन वाढल्यास अंडी उत्पादनावर वाईट परिणाम होतो. त्यादृष्टीने कोंबड्या अंडयावर येताना म्हणजे 20 व्या आठवड्यात 1200 ते 1300 ग्रॅम वजन असावे. आणि सरासरी कोंबडीचे वजन 1500 ग्रॅम असावे. त्यापेक्षा जास्त वजन झाले तर अंडी उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे कोंबड्यांच्या वजनाकडे आणि आहाराकड़े बारीक़ लक्ष द्यावे.
  • वयाच्या 72 आठवड़यापर्यंत कोंबड्या उच्च अंडी उत्पादन देतात. त्यानंतर मात्र त्या मौल्टिंग अवस्थेत म्हणजेच अंगावरील पिसे गळून पडून त्याजागी नवीन पिसे येतात. यासाठी 2 ते अडीच महीने जातात या काळात अंडी उत्पादन खूपच कमी होते.
  • नर सतत माद्यांच्या मागे लागून कळपात ताण निर्माण करतात. साधारण 100 पिल्लांमधे किमान 30 ते 40 टक्के नर तयार होतात त्यामुळे अतिरिक्त नर योग्य वेळीच कमी करणे केव्हाही  फायद्याचे असते. प्रति 8 ते 10 मादी एक नर ठेवावा.
  • खुडूक कोंबड्या अंडी देत नाहीत आणि नेस्ट बॉक्स मधील जागा मात्र अडवून ठेवतात. अशा कोंबड्याना अंडी उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे किंवा त्यांचा वापर घरच्या घरी पिल्लू निर्मिति साठी करावा (Poultry Farming).

लेखक: डॉं. शैलेश मदने

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.