हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता त्या–त्या भागात हवामानानुसार तग धरून राहणाऱ्या शेळ्या (Goat Breeds) विकसित झाल्या आहेत. बेरारी शेळीचा उगम महाराष्ट्रातील वर्धा, नागपूर या ठिकाणी झाला आहे. सध्याचा अमरावती विभाग हा ‘बेरार प्रांत’ म्हणून ओळखला जात असे. म्हणूनच या प्रांतात आढळणाऱ्या शेळ्यांना बेरारी असे पडले आहे. सध्याच्या घडीला बेरारी प्रजातीच्या शेळीचा (Goat Breeds) विस्तार विदर्भातील सर्वच ११ जिल्ह्यांमध्ये झाला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती व अकोला जिल्ह्यांत या शेळ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे.
मांस उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध (Goat Breeds For Farmers)
महाराष्ट्रात शेळीपालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते. यासोबतच दूध, लेंडीखत, चामडीसाठीही केले जाते. अशातच मध्यम बांध्याची ही बेरारी जातीची शेळी (Goat Breeds) मांस उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्वचेचा रंग करडा असून, नाकपुड्या, खुरे इत्यादींचा रंग हा बहुतांशी काळा असतो. ही शेळी भक्कम बांध्याची असून, उंच असते. रंग काळा आणि शेपूट लांब असते. बेरारी शेळीला स्थानिक भागात लाखी किंवा गावरानी या नावाने सुद्धा ओळखले जाते.
किती असते सरासरी वजन?
बेरारी शेळी ही उष्ण प्रदेशात चांगला तग धरून राहत असल्याने, तिला अग्निशिखा देखील म्हटले जाते. विदर्भातील ही शेळी प्रामुख्याने मटणासाठी वापरली जाते. पूर्ण वाढ झालेल्या बेरारी बोकडाचे सरासरी वजन ३६ किलो तर शेळीचे वजन ३० किलोपर्यंत असते. जन्मतः नर करडाचे वजन २.४६ किलो तर मादी करडाचे वजन २.३६ किलो असते. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे सरासरी वजन २३ किलो, तर मादीचे सरासरी वजन २० किलो असते.
काय आहेत वैशिष्ट्ये?
- बेरारी शेळीचे कपाळ बहिर्वक्र आहे.
- नर व मादी शेळीला शिंगे असतात व त्यांची ठेवण वरून मागे झुकलेली असते.
- शेळ्यांचे कान लोंबणारे, पानाच्या आकाराची व चपटे असतात.
- शेळी प्रथम वयात येण्याचे वय हे ९ ते १० महिन्याचे असते.
- शेळीच्या दोन वेतांतील अंतर २४० दिवस, तर विल्यानंतर पुन्हा गाभण राहण्याचा काळ ९१ दिवसांचा असतो.
- शेळीचा गाभण काळ १४७ दिवस व माजाच्या चक्राचा कालावधी हा १७ दिवसांचा असतो.
- एकंदरीत प्रजनन क्षमतेचा विचार केला असता बेरारी शेळी लवकर वयात येते. दोन वर्षांत तीन वेळा विते.
- ही शेळी एका वेतामध्ये एक करडू देण्याचे प्रमाण ४१.५६ टक्के, जुळे देण्याचे प्रमाण ५६.४५ टक्के, तिळे देण्याचे प्रमाण १.८७ टक्के, तर चार पिले देण्याचे प्रमाण ०.१२ टक्के असते.