Mango Export : देशातील आंबा निर्यातीपैकी महाराष्ट्रातून 60 टक्के आंबा निर्यात!

Mango Export From India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय बाजारपेठेवर पाच महिने राज्य करणारा फळांचा राजा आंब्याला (Mango Export) जगभरातून मागणी वाढू लागली आहे. युरोप, अमेरिकेसह 50 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रत्येक वर्षी आंबा निर्यात होत आहे. मागील वर्षी 2023-24 मध्ये 28 हजार 259 टन आंब्याची निर्यात झाली असून, 411 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे देशातील एकूण आंबा निर्यातीमध्ये (Mango Export) 60 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे.

वर्षनिहाय निर्यात आकडेवारी (Mango Export From India)

आंबा ही प्रत्येक भारतीयाची प्रथम पसंती आहे. विदेशात स्थायिक झालेल्या देशवासीयांसाठी काही दशकांपूर्वी आंबा निर्यातीची (Mango Export) सुरुवात झाली. आता विदेशी नागरिकांनाही आंब्याची चव आवडू लागली आहे. 1987-88 मध्ये 23 कोटी रुपयांचा आंबा निर्यात झाला होता. हा आकडा 2023-24 मध्ये 411 कोटींवर पोहोचला आहे. यावरून जागतिक बाजारपेठेमधील आंब्याची लोकप्रियता वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, 2020-21 मध्ये आंब्याची समुद्रमार्गे 15 हजार 594 टन तर हवाई मार्गे 3267 इतकी निर्यात झाली होती. त्यानंतर 2021-22 मध्ये समुद्रमार्गे 16 हजार 184 टन तर हवाई मार्गे 4496 टन 2022-23 मध्ये समुद्रमार्गे 14 हजार 249 तर हवाई मार्गे 4 हजार 459 टन इतकी निर्यात झाली होती.

‘या’ जातींना सर्वाधिक मागणी

दरम्यान ‘जेएनपीटी’ बंदर व हवाई सुविधेमुळे महाराष्ट्र हे आंबा निर्यातीचे प्रमुख केंद्र झाले आहे. हापूससह देशाच्या इतर राज्यांतील आंबाही मुंबईतूनच विदेशात जातो. यामुळे एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल 60 टक्के असून, प्रत्येक वर्षी तो वाढत आहे. यात मुंबई बाजार समितीमध्ये येणाऱ्या आंब्यापैकी 60 टक्के मालाची निर्यात हाेते. यात प्रामुख्याने हापूस, तोतापुरी, केसर, पायरी, हिमायत, बदामी, लंगडा, दशेरी, चौसा, राजापुरी, नीलम व इतर आंब्यांची निर्यात होत असते. तोतापुरी, हापूस व केसर यांची सर्वाधिक निर्यात होते.

निर्यातीनंतर आंब्याची तपासणी

युरोपीय देशांमध्ये निर्यात करण्यासाठी एक तासाची व्हॉट वॉटर ट्रिटमेंट करणे आवश्यक असते. अमेरिका व ऑस्ट्रेलियासाठी तीन मिनिटांची व्हॉट वॉटर ट्रिटमेंट करावी लागते. यूकेसाठी व्हॉट वॉटर किंवा रेडिएशनची गरज नसते. व्यवस्थित पॅकिंग करून माल निर्यात केला जातो. अमेरिकेचे निरीक्षक तीन महिने मुंबईत अमेरिकेत पाठविण्यात येणाऱ्या आंब्याची त्यांचे निरीक्षक स्वत: पाहणी करतात. पणन मंडळाच्या केंद्रामध्ये आंब्याची तपासणी केल्यानंतरच तो निर्यात केला जातो.