हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या केशर शेतीचे (Saffron Farming) अनेक यशस्वी प्रयोग झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय केशरला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने, केशरला प्रति किलोसाठी सध्या बाजारात विक्रमी दर मिळत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना केशर लागवडीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी विदेशात केशर लागवडीचे प्रशिक्षण घेतले असून, आज ते आपल्या राहत्या घरात केशर लागवड (Saffron Farming) करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.
विदेशात घेतले प्रशिक्षण (Saffron Farming Farmer Success Story)
रमेश गेरा असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शेतकरी रमेश गेरा यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ विदेशात नोकरी केली. याचदरम्यान, त्यांना केशर लागवडीबाबत (Saffron Farming) माहिती मिळाली. यावेळी त्यांनी महागड्या केशर लागवडीबाबत मोनोमन निर्धार केला. सुरुवातीला दोन वर्षांमध्ये त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, त्यांनी न डगमगता केशर लागवडीसाठी प्रयत्न करणे सुरूच ठेवले. त्यानंतर आता त्यांना अपयशातून केशर शेतीचा यशस्वी राजमार्ग गवसला असून, सध्या ते त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे.
किती मिळतंय उत्पन्न?
रमेश गेरा सांगतात, आपण यावेळी केशरची लागवड (Saffron Farming) करण्यासाठी काश्मीरमधून बियाणे उपलब्ध केले. ज्यातून सध्या आपल्याला 1.5 किलो पेक्षा जास्त केशर उत्पादन मिळत असून, त्यास बाजारात सध्या 2 ते 2.50 लाख रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. यशस्वी केशर शेतीचे गमक माहिती झाल्याने, सध्या आपल्याला त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. असे शेतकरी रमेश गेरा सांगतात. केसर शेतीतून आपल्याला आर्थिक प्रगती साधण्यास मदत असेही ते आवर्जून सांगतात.
करतायेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतकरी रमेश यांना केशर शेतीतून यश मिळाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत. रमेश यांनी चरक्षी सेफ्रॉन इन्स्टिट्यूट नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून, आतापर्यंत 105 हून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी आपल्या घरी प्रशिक्षण दिले आहे. त्याचबरोबर हरियाणामध्ये तुरुंगात असणाऱ्या कैद्यांनाही ते शेतीच्या प्रगत पद्धती शिकवत आहेत. जेणेकरून कैद्यांमध्येही कौशल्य विकसित होऊन, भविष्यात चांगले जीवन जगता येईल, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.