हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात सध्या सर्वत्र बियाण्याच्या साठेबाजीला (Krishi Seva Kendra) आणि काळ्या बाजाराला ऊत आला आहे. तर राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या वाढीव दराने कृषी बियाणे विक्रीच्या घटना समोर येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना सध्या बियाणे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अकोला, बुलढाणा, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. अशातच आता धाराशिव जिल्ह्यात आज (ता.३) कृषी विभागाकडून (Krishi Seva Kendra) मोठी कारवाई करण्यात आली आहे.
19 कृषी सेवा केंद्रावर कारवाई (Krishi Seva Kendra)
धाराशिव जिल्ह्यातील 19 कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये 2 कृषी सेवा केंद्र (Krishi Seva Kendra) कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तसेच 12 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर 5 केंद्राना सक्त ताकीद देण्यात आली आहे. या कृषी सेवा केंद्राच्या तपासणी दरम्यान ई-पॉस मशीन प्रमाणे बियाणे, खते साठा न जुळणे, परवान्यात समाविष्ट स्ञोताव्यतिरिक्त इतर निविष्ठांची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टरला नोंद नसणे आदी कारणामुळे कारवाई झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या दिली आहे.
यापुढे कारवाईचा थेट इशारा
दरम्यान, शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळत नसल्यामुळे तसेच वाढीव दराने बियाणे मिळत असल्याने यापुढे कृषी सेवा केंद्रांची (Krishi Seva Kendra) तपासणी सुरूच राहणार आहे. दोषी विक्रेत्यांवर बियाणे/खते/किटकनाशके कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. खत विक्री केंद्राने शेतकऱ्यांना ज्यादा दराने विक्री करणे, लिंकिग न करणे, साठा रजिस्टर अद्यावत न करणे आदी सुचनांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.