हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाला (Kharif Crop Management) सुरुवात झालेली आहे. शेतकरी (Farmers) खरीप लागवडीच्या कामाला लागले आहेत अशावेळी वेगवेगळ्या पिकांचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMKV) सल्ला दिलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर माहिती.
पीक व्यवस्थापन सल्ला (Kharif Crop Management)
- शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी त्यांची उगवण क्षमता (Seed Germination Test) तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.
- कापूस पिकाच्या लागवडीसाठी वाण (Cotton Variety) निवडताना जमीन व हवामान, कोरडवाहू किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा विचार करून वाणांची निवड करावी.
- तूर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716, बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811, पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा.
- मूग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मूग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा.
- उडीद लागवडीसाठी बीडीयू-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा.
- भुईमुग पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123 इत्यादी वाणांचा वापर करावा.
- मका पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, युवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.
फळबागेचे व्यवस्थापन (Fruit Crop Management)
- नवीन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा (Kharif Crop Management).
- पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकिय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
- तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नवीन लागवड केलेल्या व लहान केळी, आंबा व सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा.
- नवीन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापूरी, नीलम, सिंधू, साई-सुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन मल्लिका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकिय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
- वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी.
- नवीन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्का सहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकिय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला पीक व्यवस्थापन (Vegetable Crop Management)
तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी (Kharif Crop Management). नवीन लागवड केलेल्या व लहान वेल वर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.