Sugarcane Diseases: उसावरील तपकिरी ठिपके आणि तांबेरा रोगाचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे ऊस (Sugarcane Diseases) पिकात प्रामुख्याने तांबेरा आणि पानावरील तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या पानावर आढळणार्‍या बुरशीजन्य रोगांमुळे (Fungal Diseases) पिकाचे अंदाजे 5-40 टक्केपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते. या रोगांची लागण झाल्यामुळे पानाच्या पेशी, त्यामधील हरीतद्रव्य यांचा नाश झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते त्यामुळे उसाचे उत्पादन आणि साखर उतारा सुध्दा घटतो. उसाचा नवीन पोंगा व कोवळी पाने रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली आढळून येतात आणि ऊस उत्पादन व उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो. जाणून घेऊ या रोगांची (Sugarcane Diseases) लक्षणे आणि नियंत्रण उपाय

तपकिरी ठिपके (Sugarcane Brown Spot)

जास्त पावसाचे प्रमाण असलेल्या भागामध्ये सॅरकोस्पोरा लॅान्जिपस नावाच्या बुरशीमुळे हा बुरशीजन्य रोग (Sugarcane Diseases) होतो. सुरूवातीला उसाच्या जुन्या पानांच्या दोन्ही बाजुवर अंडाकृती आकाराचे लालसर ते तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. या ठिपक्या भोवती पिवळ्या रंगाचे वलय दिसते ठिपक्याचा मध्यभाग वाळून, करड्या रंगाचा ठिपका, सभोवती लालकडा त्याला लागूनच पिवळे वलय असे एकमेकांत मिसळलेले असंख्य ठिपके निदर्शनास येतात. पानांवरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात अशा ठिपकयांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्लेषण होत नाही. त्यामुळे ऊस उत्पादनावर (Sugarcane Production) आणि साखर उतार्‍यावर अनिष्ट परिणाम होतो. रोगाची (Sugarcane Diseases) लागण मोठ्या प्रमाणावर झाल्यास उसाच्या कांड्याची लांबी व जाडी कमी होतो.

तांबेरा (Sugarcane Rust Disease)

उसाच्या पानावरच दिसून येणारा हा बुरशीजन्य रोग आहे (Sugarcane Diseases). सुरवातीला बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होऊन पानावर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्याची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो. ठिपक्याच्या भोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन, पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्याच्या जाग्यावर उंचवटे तयार होतात. असे ठिपके फुटुन नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. तांबेराग्रस्त पाने हातावर चोळल्यास बिजाणूची पावडर पडते. हवेव्दारे या बिजाणूंचा प्रसार होऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो. पानांवरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात. या रोगग्रस्त ठिपक्यातील पेशी मरुन जाऊन पाने करपलेली दिसून येतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत व्यत्यय आल्याने उसाचे उत्पादन घटते.

रोगाचा प्रसार

उसाच्या पानावर पावसाच्या अथवा दवाच्या स्वरुपातील असलेले पाणी प्रामुख्याने रोग वाढीसाठी महत्वाचे व अनुकुल घटक आहे. पानावर ओलसरपणा असताना बीजाणू रुजून बुरशी तयार होते. ही बुरशी पानांच्या आंतरभागात प्रवेश करुन रोग निर्मिती करते. पानामध्ये रोगनिर्मिती प्रक्रिया सुरु झाल्यापासून 3 ते 4 दिवसात पानावर रोगाचा प्रार्दुभाव दिसून येतो. प्रामुख्याने या रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो. तसेच या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो. काही ठिकाणी मॉन्सूनचा पाऊस संपल्यानंतर पानावर आढळणार्‍या रोगांचा (Sugarcane Diseases) प्रार्दुभाव कमी होत गेलेला आढळून येतो.

अनुकुल वातावरण

या रोगांची लक्षणे प्रामुख्याने जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यत दिसून येतात. जुलै ते सप्टेंबर या काळात मॉन्सूनमुळे हवेतील सापेक्ष आर्द्रतेत 80-90 टक्के वाढ, ढगाळ उष्ण व दमट  वातावरण, वाहणारे वारे आणि सकाळचे धुके व पडणारे दव ही स्थिती रोग प्रसारास अनुकूल असते. रोगास बळी पडणाऱ्या जातीची लागवड, नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर, योग्य निचरा न होणारी जमीन, यामुळे सुद्धा या रोगाचा प्रसार होतो.   

एकात्मिक नियंत्रण उपाय (Integrated Disease Management)

वेळोवेळी ऊस पिकाचे सर्वेक्षण करुन, रोगांची (Sugarcane Diseases) लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहून खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

  • मॉन्सून हंगामामध्ये रोगाच्या प्रादुर्भावाबाबत ऊस पिकाचे सर्वेक्षण अथवा पाहणी करून प्रतिबंधक उपाय म्हणून शिफारसीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • ऊस तुटून गेलेल्या जमिनीत पुनर्लागवड करायची असल्यास पूर्वी तुटून गेलेल्या उसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करावा.
  • उसातील रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावी.
  • निरोगी मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
  • रोगप्रतिकारक्षम जाती निवडून त्यांची लागवड करावी. उदा. को 86032
  • योग्य निचरा होणार्‍या जमिनीत ऊस लागवड करावी.
  • लागवडीसाठी रूंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास उसामध्ये सूर्यप्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
  • नत्राची मात्रा शिफारसीनुसारच द्यावी.
  • पावसाळ्यात जास्त काळ पाणी साचलेल्या ऊस भागातील पाण्याचा निचरा करावा.
  • पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाच्या (Sugarcane Diseases) नियंत्रणासाठी मॅन्कोझेब अथवा कॅापर ऑक्सीक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 0.3 टक्के (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात घेऊन 15 दिवसाच्या अंतराने स्टिकरचा वापर करून 2-3 फवारण्या कराव्यात.
  • उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी 3 ग्रॅम/लि.पाणी मॅन्कोझेब किंवा टेबुकोन्याझोल 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 10-15 दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करून 2-3 फवारण्या कराव्यात.
  • सामूहिक पद्धतीने रोगाचे (Sugarcane Diseases) नियंत्रण करावे.  
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.