हॅलो कृषी ऑनलाईन : शेवगा लागवड करण्यासाठी जून-जुलै महिन्यांमध्ये पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो. कारण या वेळी हवेतील आद्रता वाढते. जेणेकरून उन्हाची तीव्रता देखील कमी असते. अशावेळी रोपांची लागवड केल्यास रोपे उगवण्यास अनुकूल वेळ असते. या लेखात आपण शेवगा पिकाचे पावसाळ्यात व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती घेऊ.
शेवगा पिकास जास्त पावसामुळे होणारे दुष्परिणाम
पाणी धरून ठेवणारी जमीन तसेच ज्या रानात पावसाळ्यात जास्त दिवस पाणी साचून राहते व पाणी बाहेर काढून देण्याचा काहीच पर्याय उपलब्ध नसतो. अशा जमिनीत शक्यतो शेवगा लागवड करणे टाळावे.संततधार पाऊस असल्यास किंवा रोज पाऊस पडत राहिल्यास शेवग्याच्या मुळांजवळ बरेच दिवस ओलावा राहतो, अशा अवस्थेत मुलांना बुरशी लागते व मुळकुज होण्याची दाट शक्यता असते.मुळांना बुरशी लागल्यामुळे, पाणी पिवळी पडतात तसेच पानगळ व फुलगळ होते.मुळकुज जास्त प्रमाणात असेल तर झाडे सुकून जाऊन ते मरू शकतात. अशा अवस्थेत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असते.
शेवगा झाडाची मुळे इतर झाडाच्या तुलनेत अत्यंत नाजूक असून, जास्त पाणी मुळांजवळ राहिल्यास मुळे कुजतात. तसेच त्यांच्या अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमतेवर परिणाम होतो.जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकऱ्यांना शेवगा पिकासाठी जास्त कसरत करावी लागते. कारण आज हिरवा दिसणारे शेवगा जास्त पावसामुळे पिवळा दिसू शकतो.पावसाळ्यात किंवा पावसाच्या अगोदर शक्यतो पंजा छाटणी करून घेणे महत्त्वाचे असते. जेणेकरून पावसाच्या महिन्यात फुटवे फुटून त्यांचे फांदीत रूपांतर होईपर्यंत पावसाचा कालावधी निघून जातो आणि नंतर फुलधारणा होऊन उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहेत.
पावसाळ्यात सगळ्यात जास्त प्रादुर्भाव म्हणजे बुरशी लागण होय. पावसाळ्यात बुरशी सोबतच फळ माशी, मावा, खोडकीड, हुमणी, पाने गुंडाळणारी तसेच पाने खाणारी अळी इत्यादी किटकांचा प्रादुर्भाव दिसतो.
पावसाळ्यात शेवगा पिकाची काळजी कशी घ्यावी?
–पावसाळा चालू होण्याअगोदर बांधावरील लिंबाच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करणे.
— जेणेकरून हुमणीचे नियंत्रण पतंग अवस्थेत करता येऊ शकते.
–पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतात पाणी जास्त काळ थांबू न देणे
–म्हणजेच शेतात पाणी साचून राहत असेल तर ते बाहेर काढण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते.
–पतंगा अवस्थेतील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी एकरी किमान दोन प्रकाश सापळे लावावेत.
–शेवगा झाडाच्या खोडाजवळ तण काढून घ्यावे. जेणेकरून खोडकिडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो.
–खोडाजवळ मातीचा भर द्यावा. झाडे लहान असतील तर वादळामध्ये पावसात झाडे पडू शकतात.
–पावसाळा चालू झाल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व ह्युमिक ऍसिड ड्रिप द्वारे द्यावे किंवा त्याची आळवणी करावी.