हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या पावसाळी हंगामात पाऊस हा अनियमित राहिला आहे. कधी कडक ऊन ,कधी जोरदार पाऊस तर कधी ढगाळ वातावरण याचा परिणाम पिकांवर झालेला दिसतो आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आजच्या लेखात आपण सोयाबीन वरील कीड आणि त्याचे व्यवस्थापन याबाबतची माहिती करून घेणार आहोत.
तंबाखूवरील पाने खाणारी अळी
हि बहुभाक्षीय किड असून ती उडीद, सोयाबीन, कापूस, टमाटे, तंबाखू, एरंडी, मिरची, कांदा, हरभरा, मका इत्यादी पिकांमध्ये आढळून येते. मादी पतंगाने घातलेल्या एका अंडीपुंज्यामध्ये साधारणतः 80 ते 100 अंडी असतात. अंडीपुंज्यातून बाहेर पडल्यावर हि अळी फिकट हिरवी आणी थोडीशी पारदर्शक असते. या अळीच्या कोशावास्थेपर्यंत जान्या अगोदर 5-6 अवस्था होतात. पहिल्या 2 अवस्थामध्ये ह्या अळ्या समूहामध्ये पानांच्यामागील बाजूस राहून पानातील हरितद्रव्य खातात, त्यामुळे पाने जाळीदार होतात. तृतीय अवस्थेपासून या अळ्या विलग होऊन स्वतंत्रपणे सोयाबीनची पाने, कोवळी शेंडे, फुले व कोवळ्या शेंगा खातात. परिणामी उत्पादनात लक्षनीय घट येते.
हिरवी उंट अळी
हि अळी नावाप्रमाणेच हिरवी असून पोटावर कमी असलेल्या पायांमुळे ती उंटाप्रमाणे पाठीस विशिष्ट वाक देऊन किंवा कुबड काढून चालते.
मादीचा पतंग एकाठिकाणी केवळ एकच अंडे घालतो. त्या अंड्यामधून निघालेली अळी प्रथम पानांमधील हरितद्रव्य खाते.
नंतर मोठी झालेली अळी पानांचा पूर्ण भाग खातात त्यामुळे पानांच्या शिराच शिल्लक राहतात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.
पाने गुंडाळणारी अळी
हि अळी हिरवट रंगाची असून तिचे डोके काळे असते.
अळी सुरुवातीला पाने पोखरून उपजीविका करते.
त्यानंतर आजूबाजूची पाने जोडून त्याच्या सुरळीत राहून जगते.
जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने भुरकट पडून वाळून जातात व झाडांची वाढ खुंटते.
केसाळ अळी
या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस पुंजाक्यामध्ये अंडे घालते.
त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पुंजक्याने झाडावर राहून पानातील हरितद्रव्य खात असल्यामुळे पाने जाळीदार होतात.
लहान अळ्या मळकट पिवळ्या तर मोठ्या अळ्या भुरकत लाल रंगाच्या असून शरीरावर नारंगी रंगाचे दाट केस असतात.
खोडमाशी
या किडीच्या प्रोढ माश्या चकचकीत काळ्या रंगाच्या असतात.
मादी माशी देठावर व पानावर अंडी घालतात.
अंड्यातून बाहेर पडलेल्या पाय नसलेल्या अळ्या पाने पोखरतात आणी त्याद्वारे फांदीत पोखरून आतील भाग पोखरून खातात त्यामुळे झाडाला अन्नद्रव्ये मिळत नाहीत.
अशा झाडांची वाढ खुंटते व ते वाळू लागतात.
चक्रीभुंगा
प्रौढ भुंग्याचे पंख कळ्या भुरकट रंगाचे असतात त्यामुळे ते सहज ओळखू येतात.
पिकाच्या सुरुवातीच्या काळात मादी भुंगे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतात, त्यामुळे अन्नपुरवठा बंद होतो आणी खापाच्या वरचा भाग वाळून जातो.
अळ्या पिवळ्या रंगाच्या असून त्याच्या खालील भागावर उभारट ग्रंथी असतात.
अळ्या देठ, फांदी आणी खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहचतात. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.
व्यवस्थापन :
–पेरणी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात संपवावी.
–पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफाराशीप्रमाणे वापरावे.
–नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.
–पिकाच्या सुरुवातीच्या काळात पिक तणमुक्त ठेवावे तसेच बांधावर असणाऱ्या किडींच्या पूरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा.
–पिकाच्याभोवती सापाला पिक म्हणून एरंडीची एक ओळ लावावी आणी त्यावरील तंबाखूची पाने खाणारी अळी आणी केसाळ अळी यांची अंडीपुंज वेळेत नष्ट करावीत.
–पिकात हेक्टरी 20 ते 25 पक्षीथांबे उभारावेत.
–तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसाठी हेक्टरी 10-12 कामगंध सापळे लावावेत तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.
–पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी, चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
–केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणारी अळी पुंजक्यामध्ये अंडी घालतात व त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या सुरुवातील एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी व अळ्या पाने अलगत तोडून किडीसह नष्ट करावीत.
–पिकांची नियमित पाहणी करून किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
–तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस. एल. एन. पी. व्ही. 500 एल. ई. विषाणू 2 मी. ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरीया रीलाई या बुरशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी.
–हिरव्या घाटे अळीकरिता हेक्टरी किमान 5-10 कामगंध सापळे शेतात लावावेत. सापळ्यामध्ये प्रति दिन 8 ते 10 पतंग सतत 2-3 दिवस आढळल्यास नियंत्रणाचे उपाययोजना करावी.
–सोयाबीन नंतर भुईमुंगाचे पिक घेऊ नये.
किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.
किटकनाशकांचा वापर :
–पाने गुंडाळणारी अळी:
फेनवलरेट 20 ईसी 17 मिली प्रति/१० लिटर पाणी
–पाने खाणाऱ्या अळ्या आणी उंट अळी:
निंबोळी अर्क 5 टक्के
क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर
एझाडीरॅकटीण (नीम ऑईल) 1500 पी. पी. एम. 25 मिली प्रति 10 लिटर पाणी.