हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे
मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या पाठी मागे लागलेले निसर्गाचे दुष्टचक्र यंदा तरी थांबेल आणि चांगले उत्पादन मिळेल या आशेवर असणाऱ्या पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम काढणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना 31 ऑगस्ट रोजी ढगफुटीचा रूपाने निसर्गाने मोठा झटका दिला. यामध्ये जिल्हातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या कासापुरी व हादगाव महसूल मंडळांमध्ये प्रचंड नुकसान होत तब्बल 18 हजार 700 हेक्टरवरील पीक नुकसान झाल्याचा कृषी विभागाने प्राथमिक अंदाज बांधला आहे .
ढगफुटीने अतोनात नुकसान
मंगळवार 31 ऑगस्ट ची पहाट पाथरी तालुक्यातील हादगाव व कासापुरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी एखाद्यावाईट स्वप्न सारखी राहिली. यावेळी साडे चार तासामध्ये कासापुरी महसूल मंडळात 106 मिलिमीटर तर हादगाव महसूल मंडळात 130 मिली मीटर एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या ढगफुटीच्या पावसाने घर संसारातील संसारोपयोगी वस्तू तर धुवून नेल्याच सोबत शेतशिवारातील खरिपातील सोयाबीन कापूस तूर इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केल्यानंतर महसूल विभाग यांनी लेखी आदेश काढत या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान पाहणीसाठी पथके स्थापन केली असून कृषी विभागाने जो नुकसानीचा प्राथमिक अंदाज बांधला आहे त्यावरून या परिसरात झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकतो.
18 हजार 700 हेक्टर नुकसान
ढगफुटी झालेल्या हादगाव बु. महसूल मंडळात 12 गावे आहेत. या मध्ये हादगाव ,किन्होळा ,वडी , पाटोदा झरी ,बोरगव्हान, सिमूरगव्हाण रेनाखळी , देवेगाव ,खेडूळा खेरडा , सारोळा (खु ) या गावाचा समावेश असून या मंडळात खरीप पेरणी क्षेत्र 11 हजार 549 हेक्टर क्षेत्र आहे तर कासापुरी मंडळात कासापुरी जवळा झूटा नाथरा मंजरथ ,पाथरगव्हाण बु पाथरगव्हाण खु , वरखेड डोंगरगाव , मरडसगाव ,बानेगाव गोपेगाव ,रामपुरी (खु )निवळी ही 13 गावे अहेत. या मंडळात खरीप पेरणी क्षेत्र 11 हजार 533 हेक्टर आहे .दोन्ही मंडळातील 25 गावातील तब्बल 18 हजार 700 हेक्टर नुकसानी चा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हरवल्यामुळे ढगफुटीनंतर या शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर शेवटची आकडेवारी समोर येणार असून शासनाने शेतकरी पुन्हा उभारण्यासाठी सढळ हाताने मदत करण्याची या ठिकाणी आता गरज निर्माण झाली आहे .