गोदावरीला महापुर ! पाणी गोदाकिनारी गावातील वेशीपर्यंत , खरिपाला मोठा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यात मंगळवारी पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केलेला पहायला मिळाला. मुसळधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील सगळी कडे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तब्बल चोवीस तासापर्यंत वाहतूक ठिक ठिकाणी आलेल्या पुरामुळे विस्कळीत झाली होती.

यावेळी पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच गोदावरी नदी मध्ये 3 लाख 33 हजार क्युसेकने पाणी विसर्ग राहील्याने नदीने सीमोल्लंघन करत रौद्ररूप धारण केले. असुन बुधवारी सकाळी जिल्ह्यातील गंगाकिनारी असणाऱ्या अनेक गावांच्या वेशीपर्यंत महापुराचे पाणी आले होते. या परिस्थीतीने गोदाकिनारी भागातील पिके पाण्याखाली गेले आहे .

अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने जिल्हात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर 24 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे .हा पाऊस पूर्ण मराठवाड्यामध्ये असल्याने गोदावरी नदीला 2006 नंतर पहिल्यांदाच महापूर आल्याची दृश्य पाहायला मिळाले .पुराचे पाणी पाथरी तालूक्यातील पाटोदा ,निवळी, मर्डसगाव , नाथ्रा , रामपुरी (रत्नेश्वर ), ढालेगाव, गुंज , गौंडगाव , कानसुर , अंधापुरी , उमरा ,लिंबा , डाकूपिंप्री,विटा व मुदगल व सोनपेठ , गंगाखेड, पालम व पुर्णा तालुक्यातील अनेक गावापर्यंत धडकले होते . त्यामुळे या गावांच्या गोदाकिनारी येणाऱ्या शेतशिवारामधील पिकांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

6 सप्टेंबर च्या रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली होती 7 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला होता .सायंकाळी 5 नंतर पावसाने विश्रांती घेतली होती .दरम्यान माजलगाव येथील सिंदफणा धरणांमधून व गोदावरी नदीवरील वरच्या भागातील उच्च पातळी बंधाऱ्यांमधून गोदावरी नदी पात्रात 97 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यामधुन 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता 3 लाख 33 हजार 26 क्युसेक ने पाणी विसर्ग चालू होता .बुधवारी सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे व सिंधफणा धरण व उच्च पातळी बंधाऱ्यांतून पाण्याचा आवक कमी होत असल्याने गोदावरीचा पूर दुपारनंतर हळूहळू ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात सरासरी 80 .5 मिमी एवढा पाऊस

दरम्यान बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील ओढ्या नाल्यांना आलेला पूर ओसरला होता . त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली होती .परंतु पाथरी तालूक्यातील खेरडा नाल्याला आलेल्या पाण्यामुळे निवळी ,गोपेगाव ,पाटोदा व वडी या गावांचा पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटलेला होता .या गावांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे .प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी 80 .5 मिमी एवढा अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे .