हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. राज्यातील बहुतांश भागात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे त्याची योग्य साठवणूक झाली तर योग्य दर मिळणार आहे. सध्या रब्बी हंगामातलाच म्हणजे फेब्रुवारीमध्ये तयार झालेला कांदा हा बाजारात दाखल होत असून त्यालाच अधिकचा दर मिळत आहे. मात्र कांद्याची योगय चाळ बांधली जाऊन त्याची साठवणूक योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्यामुळे कांदा चाळ कशी उभी केली जाते..याला अनुदान काय आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत अनुदान दिले जाते. तर यासाठी विभागाच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयांशी संपर्क महत्वाचा आहे.
अनुदान कीती आहे?
–1 टन कांदा चाळ बांधकामासाठी 6 हजार रुपये मोजावे लागतात.
–या रकमेच्या 25 टक्के म्हणजे रु.1500/- प्रति मे.टन एवढे अनुदान आहे.
— कांदा चाळ उभारणीला आलेल्या खर्चाची 25 टक्के रक्कम अनुदानपोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे.
–वैयक्तिक शेतकऱ्यास जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी रु.1,50,000/- अनुदान देण्यात येत आहे.
कसा घ्यावा लाभ?
–कांदाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी शेतकऱ्याने किंवा संस्थांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून घेणे गरजेचे आहे.
–त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती सादर करावा लागतो.
–यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत ते आपण पाहू.
वैयक्तिक शेतकऱ्यासाठी
1. विहीत नमुन्यातील अर्ज.
2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडाव लागणार आहे.
3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.
4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल.
5. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.
6. कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.
7. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा.
8. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल.
कांदा चाळीची उभारणी करताना घ्यावयाची काळजी
1 जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदुन आराखडानुसार सिमेंट काँक्रेटचे कॉलम उभारणे आवश्यक आहे.
2 कांदा सावणूकीची जागा जमिनीपासून दिड ते तीन फूट उंच असणे आवश्यक आहे. खालील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा सोडणे बंधंनकाराक असणार नाही. परंतु अतिउष्ण हवामानाच्या जिल्ह्यामध्ये खालील बाजूस मोकळी हवा खेळती राहील, यादृष्टीने कांदाचाळीची उभारणी करावी लागते.
3 या कॉलमवरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपुर्ण सांगाडा तयार करावा.
4 एक पाखी कांदा चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर तर दुपाखी कांदाचाळी उभारणी पुर्व-पश्चिम करावी. कांदाचाळी साठी छपरासाठी सिमेंटचे पत्रे यांचा वापर करावा.
5. 25 मे.टन कांदाचाळी साठी लांबी 40 फुट प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी रुंद 4 फुट, बाजुची उंच 8 फुट मधली उंची 11.1 फुट दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंदी 5 फुट , कांदाचाळीची एकुण रुंदी 3.9 मी अशा रितीने कांदा चाळीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत. चाळीची आतील कप्प्याची रुंदी ही 4 फुट पेक्षा जास्त नसावी. 50 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे व रुंदी/उंचीचे प्रमाण हे 25 मे.टन क्षमतेप्रमाणे कायम राहील हे पाहणे महत्वाचे आहे.
6 कांद्याची साठवणूक फक्त 5 फुटांपर्यंत करावी.
7 चाळीच्या छतास पुरेसा ढाळ द्यावा. कांदा चाळीच्या छतासाठी वापरण्यात आलेले पत्रे बांधकामापेक्षा 1 मीटर लांब असावेत व छताचा कोन 22 अंश अंकाचा असावा.
8 कांदाचाळीचे छत हे उन्हाळ्यामध्ये उष्णता प्रतिबंधक वस्तुंनी अच्छादीत करावे.