हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन , कापूस, कांदा अशा पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र निदान रब्बीचा हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. राज्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. राज्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू ,हरभरा यासारखी पिके प्रामुख्याने घेतली जातात. योग्य वेळी पेरणी झाली तरच रब्बीचे उत्पादन चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे रब्बीचे नियोजन कसे करायचे याची माहिती कृषी अधिकारी बनसावडे यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे. पाहुयात शेतकऱ्यांकरिता त्यांनी कोणता महत्वपूर्ण दिला आहे.
१) सोयाबीनची काढणी कामे उरका
–सध्या मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. तर ऊनाचा कहर पाहवयास मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन काढणी आता सुकर जात आहे.
–सोयाबीनची काढणीच नाही तर काढलेले सोयाबीन सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक आहे.
–पावसाचे पुनरागमन झाले तरी अधिकचा धोका होणार नाही.
–आता काढणी झाली मग मळणीही उरकून घेऊ असा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो मात्र, यातच वेळ खर्ची केला तर रब्बीवर संकट ओढावणार आहे.
२) शेतजमिनीतील ओल महत्वाची…
–मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ओल उडणार नाही या संभ्रमात शेचकऱ्यांनी राहू नये.
–कारण मराठवाड्यातील शेतजमिनी ह्या हलक्या स्वरुपाच्या आहेत.
–शिवाय दोन दिवसांपासून उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात ऊनाचा पारा वाढलेला आहे.
–अशात जर जमिनीची ओल उडून गेली तर पुन्हा शेत ओलवून पेरणी करावी लागणार आहे.
–एकतर पेरणीला महिन्याभराचा उशीर झाला आहे. त्यात पुन्हा वेळ खर्ची केला तर उत्पादनावर परिणाम होणार आहे.
३)हलक्या स्वरुपाची मशागत
–रब्बीसाठी नांगरण, मोगडण करावीच असे काही नाही.
–खरीपाचे मोकळे झालेल्या क्षेत्रावर कोळपणी केली तरी पेरणी करता येते.
–यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही वाचणार आहे आणि वेळेचीही बचत होणार आहे.
–शेतजमिनीतील तण वेचणी करुन वेळेत पेरणी झाली तर त्याचा अधिकचा फायदा होणार आहे.
४) हलकी मशागत गरजेची
–रब्बी हंगामातील पेरणी ही शेतीची मशागत न करताच केली जाते.
–पूर्वी शेतामध्ये अधिकचे तण असल्याने ही मशागत केली जात होती.
— पण आता तणनाशक फवारणीचे पेव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
–त्यामुळे शेतकरी मशागतीमध्ये वेळ खर्ची न करता थेट तणनाशकाची फवारणी करुन चाढ्यावर मूठ धरत आहे.
–याचा उत्पादनावरही काही परिणाम होत नाही.
५)गहू- हरभरा हीच मुख्य पीके
–खरीपात सोयाबीन आणि रब्बीत गहू आणि हरभरा हीच मुख्य पीके आहेत.
–हरभऱ्याचे उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
–कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून बियाणे वाटपही करण्यात आलेले आहे.
–शिवाय यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने बागायती क्षेत्रावर पाण्याची कमतरता भासणार नाही.
–केवळ पेरणी आणि पीकाची निवड हेच महत्वाचे राहणार आहे.
— मराठवाड्यात हरभरा य़ाच पीकावर शेतकऱ्यांचा भर असतो.
संदर्भ : टीव्ही ९