भारतात पहिल्यांदाच OPU-IVF तंत्रज्ञानाद्वारे म्हशीने दिला गोंडस पारडूला जन्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांच्यात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. भारतात आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे पहिल्यांदाच म्हशींची गर्भधारणा करण्यात आली असून या म्हशीने यशस्वीरीत्या एका पारडूला जन्म दिला आहे. ही म्हैस बन्नी या जातीची आहे. या पारडूच्या जन्मामुळे भारताने OPU-IVF तंत्रज्ञानात पुढचा पल्ला गाठला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ज्या म्हशीवर ह्या टेक्निकचा वापर करण्यात आला ती म्हैस गुजरात मधील एका शेतकऱ्याची आहे. सोमनाथ जिल्ह्यातील धनेज गावाच्या विनय ह्या शेतकऱ्याची ही म्हैस होती. ही सर्व प्रक्रिया विनयच्या फार्मवर जाऊन करण्यात आली. वैज्ञानिकांनी गर्भधारणेसाठी तीन म्हशींची निवड केली होती. या तिन्हीही म्हशी विनय ह्या शेतकऱ्याच्या सुशीला ऍग्रो फार्ममधीलच होत्या. बन्नी जातीच्या तीन म्हशी गर्भधारणेसाठी निवडण्यात आले होते.

अशी केली प्रक्रिया…

शास्त्रज्ञांनी म्हशीच्या अंडाशयातून बीज काढण्याच्या यंत्राद्वारे (इंट्राव्हेजिनल कल्चर डिव्हाइस-IVC) 20 अंडी काढली. तीन म्हशींपैकी एका म्हशीतून 20 अंडी आयव्हीसी प्रक्रियेद्वारे काढण्यात आली. डोनर म्हशीकडून काढलेल्या 20 अंड्यांपैकी 11 भ्रूण बनवण्यात आले. त्यापैकी नऊ भ्रूणांची स्थापना झाली, ज्यातून तीन आयव्हीएफ गर्भधारणा अस्तित्वात आल्या. दुसऱ्या डोनरकडून पाच अंडी काढण्यात आली, ज्यातून पाच भ्रूण तयार करण्यात आले. पाचपैकी चार भ्रूण रोपण करण्यासाठी निवडले गेले आणि या प्रक्रियेतुन दोन गर्भधारणा झाल्या. तिसऱ्या डोनरकडून चार अंडी काढण्यात आली, दोन भ्रूण विकसित करण्यात आले आणि त्यांची स्थापना करून एक गर्भधारणा करण्यात आली. ह्या प्रक्रियेतून सहा गर्भधारणा करण्यात आल्या आहेत ज्यापैकी एक गर्भधारनेपासून एका पारडू जन्माला आले.

तंत्रज्ञानाच्या वापराने शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. पण त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही होणे तेवढेच महत्वाचे आहे. हा भारतामधील पहिलाच प्रयोग आहे. मात्र यामुळे पशुधन वाढण्यास मदत तर होणारच आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी समृध्द होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.