हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन वर्षात द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढून देखील अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून येत्या हंगामापासून द्राक्षाचे दर ठरवण्यासाठी दबाव गट तयार करून शेतकरी एकजूट करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लवकरच शेतकऱ्यांची भूमिका विचारात घेऊन बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची घेणार भेट
यावेळी बोलताना विलास शिंदे म्हणाले निर्यात प्रक्रियेत कराराचा भाग व इतर अनुषंगिक खर्च वाढला आहे गेल्या दोन वर्षात दोन हजार असणारे प्रति कंटेनर भाडे गेल्या वर्षी चार हजारांवर तर आता ते सात ते आठ हजार झाले आहे. किलोला 22 रुपये यासह पॅकिंगमध्ये तीन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चालू हंगामापासून येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के पाठबळ दिल्यास फायदा होईल. वाढलेला खर्च उत्पादकांवर न पाडता तो ग्राहक किंवा बाजारपेठेतून मिळायला हवा. द्राक्ष उत्पादकांच्या भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी संघाची शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची दिल्लीत भेट घेणार आहे. यासह द्राक्ष पिका संबंधी योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे असे ते म्हणाले आहेत.
काय आहेत प्रमुख मागण्या
— केंद्र सरकारने रोड टॅप योजनेमध्ये त्वरित बदल करून तीन रुपये किलो ऐवजी नऊ रुपये 50 पैसे प्रति किलो कर स्वरूपाचा संपूर्ण परतावा निर्यातदारांना ऐवजी थेट उत्पादकाला द्यावा.
— नैसर्गिक आपत्ती पासून वाचण्यासाठी शासनाने क्रॉप कव्हर व वाण बदलासाठी अनुदानाची योजना आणावी.
— चालू हंगामात शिपिंग भाडेवाढ पॅकिंग मटेरियल खर्च वाढणार प्रति किलो 15 रुपये अनुदान देण्याची तरतूद करावी.
— पैसे न देणाऱ्या निर्यातदारावर अपेडा मार्फत कारवाई करून शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळवून देण्यासाठी केंद्रानं निर्देश द्यावेत तसेच अशा निर्यातदारांना निर्यातीस प्रतिबंध करावा.
— स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष उत्पादकांची फसवणूक होत असल्याने व्यापारी निर्यातदार त्यांच्याबरोबर लिखित स्वरूपात कायदेशीर सौदा पावती होण्यासाठी राज्य शासनाने पणन मंडळातर्फे व्यवस्था त्वरित उभी करावी.
द्राक्ष उत्पादकांच्या विविध मागण्या व मुद्द्यांवर नवीन धोरण निश्चित करण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघ नियोजन करत आहेत. याबाबत संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे बुधवारी पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी संघाचे संचालक विलास शिंदे, रवींद्र बोराडे, सुरेश कळमकर, नाशिक विभागीय संचालक रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, विभागीय संचालक रामनाथ शिंदे, संदीप ढिकले, भाऊसाहेब गवळी, उमेश नवले, नाशिक विभाग व्यवस्थापक योगेश गडाख, आदी उपस्थित होते.