हॅलो कृषी ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2022 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. याविषयी आता अनेक क्षेत्रामधून प्रतिक्रिया येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हंटले की, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सगळा शेतीमाल हमीभावाने खरेदी करणार असे अर्थमंत्री सांगतात. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे मात्र या सगळ्यांना मी आठवण करून देतो की गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीमाल खरेदीसाठी दोन लाख 47 हजार कोटींची तरतूद केली होती. परंतु सरकारने सगळा शेतमाल खरेदी केला नाही. मात्र पैसे सगळे खर्च झाले मात्र शेतकऱ्यांमध्ये कुठे आनंद दिसला नाही
मागील वर्षीपेक्षा यावर्षी तरतुदीत कपात
यावर्षी त्यामध्ये दहा हजार कोटींची कपात केली आहे. दोन लाख 37 हजार कोटी रुपये तरतूद केलेली आहे म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा दहा हजार कोटी निधीची तरतूद कमी आहे. तिथे स्वागत करण्यासारखं काय ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. शिवाय गेल्या वर्षी एकूण बजेटच्या 4.36 टक्के तरतूद शेतीसाठी होती. या वर्षी 3. 76 टक्के इतकी करण्यात आली आहे. म्हणजे पाऊण टक्क्यांनी शेतीचे बजेट कापण्यात आले. त्यामुळे त्या बजेटचे स्वागत का करायचं / असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या कार्यकर्त्यांना खूश करायचा आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचा खुशाल समर्थन करावं… हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.