हॅलो कृषी ऑनलाईन : बांबूपासून इथेनॉल रिफायनरी निर्मिती प्रकल्प लवकरच लातुरात सुरु होतो आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात मांजरा नदीचे पात्र जेवढ्या क्षेत्रावर आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. लातूरच्या ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात 5 हजार एकरावर बांबूची लागवड करावी. येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्वावर बांबू पासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यतील ‘अलमॅक बायोटेक लॅब’ च्या दुसऱ्या टप्प्यातील लॅबच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याबाबत एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते. यावेळी बांबूला मार्केटिंग मिळवून देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. लातुरात सहकारी तत्वावर बांबू पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची रिफायनरी उभी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते . दरम्यान , या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र बांबू बोर्डचे संचालक पी. बी. भालेराव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्त्तात्रय गवसाने,आंतरराष्ट्रीय बांबू तज्ञ संजीव करपे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, अभिजित साळुंखे तसेच विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्याकाळी सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास चालना दिली आणि आता लातूर सोयाबीनचे हब म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे सहकारी तत्वावर बांबूपासून तयार होणाऱ्या रिफायनरीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
देशातील बांबूचा ब्रँड म्हणून पाशा पटेल यांची ओळख होत असून आपण त्यांच्या या शेतकरी हिताच्या कामाला मदत करु असे आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी त्यांनी लोदगा येथील अलमॅक बायोटेक लॅब देशात पहिली बांबू वरली टीश्यू कल्चर लॅबरोटरी असून आज घडीला एक तासात 5 हजार रोपटे तयार होतात. येत्या काळात या लॅबरोटरीतून 150 कोटी रोप तयार करण्यात येतील आणि पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने होतील असे सांगून त्यांनी बांबूचे महत्व विशद केले.