हॅलो कृषी ऑनलाईन : पिक विमा योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादन आणि जोखमींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, अतिथंडी, अवर्तन, उष्णता, नैसर्गिक बाब, जलप्रलय, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होते. राज्यामध्ये 2016 च्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. मात्र पूर्वी ती कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक होती. आता गेल्या वर्षीपासून सरकारनं कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदवण्यास परवानगी दिली आहे. मात्र शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच ते सहभाग नोंदवू शकतात. पण पिक विमा काढल्यानंतर तो मंजूर झाला कि नाही याची माहिती कशी मिळेल? त्या संबंधीची तक्रार कुठे करायची? याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत.
पिक विम्याची मंजुरी आहे की नाही कसे तपासाल?
— तुम्ही पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला असेल तर आपला पिक विमा मंजूर झाला की नाही ते आपल्याच मोबाईल वर पाहू शकता.
— सर्वात आधी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या PMFBY ऑफिशियल वेबसाइट वर जा.
–त्यानंतर Application Status या पर्यायावर क्लिक करा.
— तुम्हाला पिक विमा काढताना पावती मिळाली असेल तर त्या पावती वरील क्रमांक टाका.
–click status क्लिक केल्यानंतर तुमचा विमा मंजूर झाला असेल तर अप्रूव्ह असे तुमच्या स्क्रीन वर दिसेल.
पिक विमा संबंधित तक्रार कुठे करावी?
— पिक विमा संबंधी शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासांच्या आत पूर्वसूचना द्यावी.
— मोबाईल मधील ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’ या ॲप द्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांक द्वारे पूर्व सूचना देता येतील.
— इंटरनेट मुळे ऍप सुरू होत नसेल किंवा टोल फ्री नंबर सतत एंगेज येत असल्यास तातडीने आपल्या बँकेत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात व महसूल विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वतः जाऊन पूर्वसूचना द्यावी.
— तुमची तक्रार नोंदवून घेतली नसेल तर तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे जावं अध्यक्ष असलेल्या तहसीलदार किंवा सदस्य सचिव पदावर असलेल्या तालुका कृषी अधिकारी तुमच्या तक्रारीची दखल घेतात मात्र या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे तक्रारीची पोच देणे गरजेचे आहे तोच अर्जावर सही शिक्का हा तुमच्या तक्रारीचा अधिकृत पुरावा असेल.